शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:05 IST2025-12-03T20:04:08+5:302025-12-03T20:05:09+5:30
विशेष म्हणजे, हे पूर्ण सूर्यग्रहण दिर्घकाळाचे असेल. जे ६ मिनिटांपेक्षाही अधिक काळ दिसेल. यामुळे हे सूर्यग्रहण, या शतकातील सर्वात दीर्घ पूर्ण सूर्यग्रहण ठरेल.

शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
वर्ष २०२७ मध्ये एक खास खगोलशास्त्रीय घटना घडणार आहे. २ ऑगस्ट २०२७ रोजी चाहत्यांना सूर्यग्रहणाचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे. हे एक दुर्मिळ आणि पूर्ण सूर्यग्रहण असेल. ग्रहण काळात दिवसा आकाशात अचानक अंधार पसरेल आणि पृथ्वीवरील तापमान कमी होईल.
विशेष म्हणजे, हे पूर्ण सूर्यग्रहण दिर्घकाळाचे असेल. जे ६ मिनिटांपेक्षाही अधिक काळ दिसेल. यामुळे हे सूर्यग्रहण, या शतकातील सर्वात दीर्घ पूर्ण सूर्यग्रहण ठरेल. एवढे दीर्घ सूर्यग्रहण आजच्या पीढीला क्वचितच पुन्हा बघता येईल. यामुळेच खगोलशास्त्रज्ञ आणि निरीक्षकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असेल.
दीर्घ कालावधीचे ग्रहण -
साधारणपणे पूर्ण सूर्यग्रहण सुमारे ३ मिनिटांपर्यंत चालते. मात्र २ ऑगस्ट २०२७ रोजी सूर्य पृथ्वीपासून सर्वाधिक दूरच्या बिंदूवर (apogee) असेल, तर चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असेल. या संयोगामुळे चंद्र मोठा दिसेल आणि सूर्याला जवळपास ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत झाकून टाकेन. महत्वाचे म्हणजे, एवढे दीर्घ पुढील ग्रहण २११४ पूर्वी दिसणार नाही.
जगात कुठे कुठे दिसेल ग्रहण? -
हे ग्रहण अटलांटिक महासागरावरून सुरू होईल आणि स्पेन व जिब्राल्टर मार्गे उत्तर आफ्रिकेत (मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया) दिसेल. यानंतर ते इजिप्तमधील लक्सर येथे सर्वाधिक काळ दिसेल. पुढे सौदी अरेबिया, येमेन आणि हॉर्न ऑफ आफ्रिका (सोमालिया) ओलांडून हिंदी महासागरात संपेल.
भारतात कुठे कुठे दिसणार? -
युरोप, आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशियाच्या अनेक भागांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसेल. याशिवाय, भारतात, नवी दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसेल आणि येथे संपूर्ण अंधार होणार नाही.