भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 07:38 IST2025-10-12T07:36:56+5:302025-10-12T07:38:02+5:30
सुदानच्या अल-फशीर शहरात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पॅरामिलिटरी फोर्सने केलेल्या ड्रोन आणि तोफखान्यांच्या हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
सुदानच्या अल-फशीर शहरात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पॅरामिलिटरी फोर्सने केलेल्या ड्रोन आणि तोफखान्यांच्या हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका ठिकाणाला टार्गेट करण्यात आलं.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्थानिक रहिवाशांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतरचे भयंकर दृश्य दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये इमारतीचं मोठं नुकसान आणि आजूबाजूला जळालेल्या फर्निचरचे तुकडे विखुरलेले दिसत आहेत.
वृत्तसंस्थेने व्हिडिओच्या स्थानाची पुष्टी केली. सॅटेलाईट फोटो आणि फाइल इमेजनरी वापरून इमारतींचं लोकेशन, छताचा आकार, फुटपाथ, झाडं ओळखण्यात आली. व्हिडिओची अचूक तारीख पडताळता आली नसली तरी, स्थानिक कार्यकर्त्यांच्या रिपोर्टमध्ये आणि इतर पुष्टीकरणांनी हल्ल्याची माहितीला दुजोरा दिली.
अल-फशीरमध्ये, RSF ने दारफुर प्रदेशातील सैन्याचा शेवटचा गड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात शहराला वेढा घातला आहे. या वेढ्यामुळे उपासमार आणि रोगराई पसरली आहे. ड्रोन आणि तोफखान्यांचे हल्ले सतत आश्रयस्थान, मशिदी, रुग्णालयांना टार्गेट करत आहेत.
अल-फशीर रेझिस्टन्स कमिटीने एका निवेदनात म्हटलं आहे की, "लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत आणि मुलं, महिला आणि वृद्धांसह इतरांना आश्रयस्थानात जाळून मारण्यात आलं आहे. हा एक क्रूर नरसंहार आहे. आश्रयस्थानावर दोन ड्रोन हल्ले आणि आठ वेळा तोफखान्याने गोळीबार करण्यात आल्या."
स्थानिक रहिवाशांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी संरक्षणासाठी त्यांच्या घरांमध्ये आणि परिसरात बंकर बांधले होते. या हल्ल्यांमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे असं म्हणणं आहे. हिंसाचार, उपासमार आणि आजारांमुळे शहरात दररोज सरासरी ३० लोकांचा मृत्यू होतो.