विशेष लेख: टेक दिग्गजांच्या सुरक्षेवर कोट्यवधींचा खर्च; विरोधकही मोठ्या प्रमाणावर वाढले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:38 IST2025-09-03T12:37:45+5:302025-09-03T12:38:05+5:30
अलीकडच्या काळात तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकलं आहे

विशेष लेख: टेक दिग्गजांच्या सुरक्षेवर कोट्यवधींचा खर्च; विरोधकही मोठ्या प्रमाणावर वाढले...
अलीकडच्या काळात तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकलं आहे. येत्या काळात तंत्रज्ञान आणखी काय-काय चमत्कार घडवील हे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असेल. त्यामुळेच जगभरातील टेक कंपन्या आणि त्यांचे प्रमुख यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे, पण त्याचमुळे त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. याच कारणानं या दिग्गजांच्या सुरक्षेवर आता खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.
मेटा प्रमुख मार्क झकरबर्ग, टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, ॲमेझॉनचे सध्याचे सीईओ अँडी जॅसी, एनवीडियाचे सहसंस्थापक जेन्सन हुआंग, जेपी मॉर्गनचे चेअरमन आणि सीइओ जेमी डायमोन. ही यातली काही प्रमुख नावं. ही नावं आज घराघरात पोहोचली आहेत. आपल्या कंपन्या आणि उद्योगाच्या बळावर अब्जावधी रुपयांची उलाढाल तर ते करत आहेतच, पण त्याचमुळे केवळ उद्याेजक ही त्यांची प्रतिमा राहिलेली नाही. राजकीय आणि सामाजिक समीकरणांमध्येही महत्त्वाची भूमिका ते बजावत आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षा ही केवळ खर्च नाही, तर कंपन्यांच्या रणनीतीचा अविभाज्य भाग झाली आहे. हे धोके आता केवळ व्यावसायिक स्पर्धक किंवा असंतुष्ट कर्मचाऱ्यांकडून नाहीत. डेटाचा गैरवापर, मोठ्या प्रमाणावर नोकरकपात, अब्जावधी डॉलर्सची संपत्ती आणि राजकारणात हस्तक्षेप यामुळे हे दिग्गज सामान्य जनतेच्या रोषाचेही लक्ष्य बनत आहेत.
२०२४ मध्ये १० मोठ्या टेक कंपन्यांनी त्यांच्या सीईओंच्या सुरक्षेवर तब्बल ४५ मिलियन डॉलर्सपेक्षा (सुमारे ३६९ कोटी रुपये) जास्त खर्च केला. यातील सर्वात मोठा वाटा मेटा प्रमुख मार्क झकरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेवर खर्च झाला आहे. गेल्या वर्षी ‘मेटा’ने त्यांच्या सुरक्षेवर २७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २२१ कोटी रुपये खर्च केले. कॅलिफोर्नियातील पालो अल्टोमधील घराची सुरक्षा आणि प्रवासादरम्यानची सुरक्षा यांचा यात समावेश आहे.
टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या सुरक्षा खर्चाची पूर्ण माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र २०२३ मध्ये टेस्लाने त्यांच्या सुरक्षेसाठी २१ कोटी रुपये खर्च केले होते. मस्क आपल्या सुरक्षेसाठी स्वतःच्याच ‘फाउंडेशन सिक्युरिटी’ या कंपनीची सुरक्षा व्यवस्था वापरतात आणि तब्बल २० बॉडीगार्ड्स सोबत घेऊन ते फिरतात.
इतर टेक दिग्गजांच्या सुरक्षेवरील खर्चही असाच भलामोठा आहे. गेल्या वर्षी जेफ बेझोस यांच्या सुरक्षेवर १३ कोटी रुपये, जेन्सन हुआंग यांच्या सुरक्षेसाठी २९ कोटी रुपये, जेमी डायमोन यांच्या सुरक्षेवर ७.२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. अँडी जॅसी यांच्यावरील सुरक्षेचं बजेटही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं.
एआय आधारित डीपफेक व्हॉइसने सध्या धोक्याचा नवा टप्पा गाठला आहे. एआय वापरून डीपफेक व्हॉइसद्वारे कंपन्यांकडून बनावट आर्थिक व्यवहार करवून घेण्याचे प्रकार झपाट्यानं वाढले आहेत. त्यामुळे आता सीईओ आणि कंपन्यांच्या डेटाची सुरक्षा ही प्राथमिकता बनली आहे. गेल्या वर्षी युनायटेड हेल्थकेअरचे प्रमुख ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तरीही हल्लेखोराला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळाला होता.