सोशल मीडियाची नशा अमली पदार्थांसारखी! बड्या कंपन्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 09:58 IST2026-01-30T09:58:41+5:302026-01-30T09:58:49+5:30
Social Media Addiction: फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब व टिकटॉक यांसारखी सोशल मीडिया माध्यमे मुलांसाठी ‘अमली पदार्थां’सारखी घातक ठरत असून, या कंपन्या अमेरिकन न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या आहेत.

सोशल मीडियाची नशा अमली पदार्थांसारखी! बड्या कंपन्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल
लॉस एंजिल्स - फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब व टिकटॉक यांसारखी सोशल मीडिया माध्यमे मुलांसाठी ‘अमली पदार्थां’सारखी घातक ठरत असून, या कंपन्या अमेरिकन न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या आहेत. या कंपन्यांविरुद्ध १६०० लोकांनी दाद मागितली असून, मुलांत सोशल मीडियाचे व्यसन वाढविल्याचा आरोप केला आहे. या कंपन्यांनी ॲप्स अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ज्यामुळे मुलांमध्ये त्याचे ‘नशे’सारखे व्यसन लागते. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, असा आरोप करण्यात आला आहे.
तंबाखू खटल्याशी तुलना
या कायदेशीर लढाईची तुलना १९९० च्या दशकातील प्रसिद्ध ‘तंबाखू खटल्या’शी केली जात आहे, ज्यानंतर सिगारेट कंपन्यांवर जगभर कठोर निर्बंध लादले गेले. या खटल्याचा निकाल जर मुलांच्या बाजूने लागला, तर संपूर्ण सोशल मीडिया उद्योगाची कार्यपद्धती बदलू शकते. यापूर्वी टिकटाॅक आणि स्नॅपचॅटने काही प्रकरणांत न्यायालयाबाहेर तडजोड
केली आहे.
काय आहेत मुख्य आक्षेप?
हा खटला कोणत्याही विशिष्ट पोस्ट किंवा व्हिडीओबद्दल नसून ॲप्स ‘डिझाइन’बद्दल आहे.
वकिलांच्या मते, एंडलेस स्क्रोलिंग, अल्गोरिदम आणि सातत्याने येणारे नोटिफिकेशन्स यांसारख्या फीचर्समुळे मुले तासन् तास स्क्रीनला चिकटून राहतात.
मुलांच्या मानसशास्त्राचा वापर जाहिरातींमधून नफा वाढीसाठी कंपन्या करतात.
भविष्यातील प्रकरणांसाठी मार्गदर्शक खटला
याला ‘बेलवेदर ट्रायल’ किंवा मार्गदर्शक खटला मानले जात आहे, जो भविष्यातील अशा प्रकरणांसाठी एक उदाहरण ठरेल.
या प्रकरणाच्या केंद्रस्थानी १९ वर्षीय तरुणी असून, तिला ‘केजीएम’ या नावाने ओळखलेजात आहे.
तिचा आरोप आहे की, बालपणातच सोशल मीडियाच्या वापरामुळे तिला त्याचे व्यसन लागले आणि सतत ऑनलाइन राहण्याच्या ओढीमुळे तिला नैराश्य व आत्मघातकी विचारांचा सामना करावा लागला.