अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:33 IST2025-11-10T11:33:16+5:302025-11-10T11:33:40+5:30
United State News: अमेरिकेत शटडाऊनमुळे शनिवारी सुमारे हजाराहून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. जर शटडाउनवर लवकर तोडगा निघाला नाही, तर विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल, अशी भीती अर्थविश्लेषकांनी दिली आहे.

अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
वॉशिंग्टन - अमेरिकेत शटडाऊनमुळे शनिवारी सुमारे हजाराहून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. जर शटडाउनवर लवकर तोडगा निघाला नाही, तर विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल, अशी भीती अर्थविश्लेषकांनी दिली आहे. शनिवारी अटलांटा, शिकागो, डेनव्हर, न्यू जर्सी येथून निघणाऱ्या सर्व विमानोड्डाणांची सेवा विस्कळीत झाली होती. उत्तर कॅरोलिना राज्यातील शेर्लोट विमानतळावरील १३० उड्डाणे रद्द करण्यात आली; तर न्यूयॉर्क शहराच्या नजीक असलेल्या काही विमानतळांवर रडार केंद्रे व नियंत्रण टॉवरमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्याचाही परिणाम विमानसेवांवर झाला.
कर्मचाऱ्यांची टंचाई : शटडाऊनमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
आहेत. याचा परिणाम देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. शटडाऊनमुळे युरोप व अन्य देशांत जेथे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, तेथील हजारो स्थानिक कर्मचाऱ्यांना गेले सहा आठवडे पगार दिलेला नाही. काही ठिकाणीच अन्य देशांनी कर्मचाऱ्यांवरील खर्चाची देणी चुकवली आहेत. इटली व पोर्तुगालमध्ये तर विनावेतन कर्मचारी काम करत आहेत.
उड्डाणे उशिरानेच
शुक्रवारपासून सुरू झालेल्या या गोंधळात, शनिवारी १,५०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली, तर ६,६०० पेक्षा जास्त विलंब झाले. रविवारी आणखी १,००० उड्डाणे रद्द झाली आणि शेकडो उशिराने उड्डाण घेत होती.
तोडगा कधी निघणार?
अमेरिकेत सरकार शटडाऊनमुळे संपूर्ण व्यवस्था ठप्प झाली असताना सेनेटमध्येही प्रगती दिसत नाही. सरकार जानेवारीपर्यंत पुन्हा सुरू करण्यासाठी आणि काही विभागांना पूर्ण वर्षासाठी निधी देण्यासाठी मतदान घेतले जावे यासा रिपब्लिकन नेते प्रयत्न करत होते. पण या प्रस्तावाला डेमोक्रॅट्सचा पाठिंबा मिळेल याची कोणतीही खात्री नाही.
"सरकार पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक मतांपासून आपण फक्त काही मतं दूर आहोत," असे सेनेट मेजॉरिटी लीडर जॉन थ्यून यांनी सांगितले. 'काही मतं' मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होत नसल्याने परिस्थिती ताणली जात आहे.