शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:27 IST2025-12-01T16:27:03+5:302025-12-01T16:27:43+5:30
Sheikh Hasina Bangladesh Politics: एक मुस्लीम देश या प्लॅनिंगसाठी जोर लावत असल्याचे चित्र आहे

शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Sheikh Hasina Bangladesh Politics: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायाधिकरणाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली. यावरून टीकाटिप्पणी सुरू असतानाच आता नवीन अपडेट आली आहे. शेख हसीना यांना बांगलादेशच्या राजकारणात सक्रिया करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कतार या प्रयत्नात सक्रियपणे मध्यस्थी करत आहे. दोहा हे या वाटाघाटीचे मुख्य केंद्र बनले असल्याची चर्चा आहे. बांगलादेशच्या बाजूने या करारावर विचार सुरू असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान यात सहभागी असल्याची माहिती आहे. ते अलीकडेच भारताला भेट देऊन आले आहेत.
नॉर्थ ईस्ट पोस्टच्या मते, कतारचे माजी गुप्तचर प्रमुख या प्लॅनचे नेतृत्व करत आहेत. हे सर्व शेख हसीना यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी केले जात आहे. शेख हसीना यांच्याबाबतच्या वाटाघाटींमध्ये संपूर्ण बांगलादेश सरकार सहभागी आहे की नाही, किंवा या करारात कतार सरकार कोणत्या पातळीवर सहभागी आहे हे या वृत्तपत्राने स्पष्ट केलेले नाही.
या प्लॅनचा भाग म्हणून सर्वप्रथम अवामी लीगसाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कतारचे माजी गुप्तचर प्रमुख खुलाईफी आणि खलीलूर रहमान गेल्या सात महिन्यांत चार वेळा भेटले आहेत. खलीलूर यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशीही भेट घेतली आहे. कतारचा प्राथमिक प्रयत्न बांगलादेशमध्ये अवामी लीगचा मार्ग मोकळा करणे आहे. याचा अर्थ असा की सरकारने प्रथम अवामी लीगवरील बंदी उठवावी.
कतार आणि अमेरिका बांगलादेश निवडणुकीत अवामी लीगला सहभागी करण्याची परवानगी देण्याच्या बाजूने आहेत. सध्या हा मुद्दा चर्चेत आहे. शेख हसीना गेल्यानंतर, युनूसच्या अंतरिम सरकारने अवामी लीगवर बंदी घातली. या बंदीमुळे अवामी लीग बांगलादेशच्या निवडणुका लढवू शकत नाही. शेख हसीनांचे समर्थक याचा निषेध करत आहेत. अलिकडेच शेख हसीना यांनी एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये म्हटले होते की जर त्यांच्या लोकांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली गेली नाही, तर ते रस्त्यावर उतरून निषेध करतील. आता त्यांना संधी मिळेल अशी चर्चा दिसत आहे.