Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:49 IST2025-11-25T09:43:27+5:302025-11-25T09:49:26+5:30
Benjamin Netanyahu India Visit Postponed: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांचा भारत दौरा पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे.

Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या वर्षाच्या अखेरीस होणारा त्यांचा नियोजित भारत दौरा पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे. दोन आठवड्यांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या सुरक्षेच्या चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला. गेल्या दशकातील सर्वात घातक असलेल्या या दिल्ली बॉम्बस्फोटात १५ लोकांचा मृत्यू झाला. तर मोठ्या संख्येत नागरिक जखमी झाले.
इस्रायली मीडिया प्लॅटफॉर्म i24News ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नेतान्याहू आता सुरक्षा यंत्रणांकडून पूर्ण मूल्यांकन झाल्यानंतर पुढील वर्षाच्या त्यांच्या भारत भेटीची नवीन तारीख निश्चित करण्याचा प्रयत्न करतील. या वर्षात नियोजित असलेला नेतन्याहू यांचा भारत दौरा रद्द होण्याची किंवा पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी, सप्टेंबर महिन्यात इस्रायलमध्ये पुन्हा निवडणुका जाहीर झाल्याने वेळापत्रकात बदल झाल्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्याआधी एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीमुळेही त्यांचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला होता. नेतन्याहू यांनी २०१८ मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता.
दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले होते. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, "भारत आणि इस्रायल ही शाश्वत सत्यांवर उभी असलेली प्राचीन संस्कृती आहेत. दहशतवादी आपल्या शहरांवर हल्ला करू शकतो. परंतु, तो आपल्या आत्म्याला कधीही हलवू शकत नाही. आपल्या राष्ट्रांचा प्रकाश आपल्या शत्रूंच्या अंधारावर मात करेल." सुरक्षा यंत्रणांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतरच नेतान्याहू यांच्या भारत भेटीची अधिकृत नवीन तारीख निश्चित केली जाईल, अशी अपेक्षा आहे.