वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 11:56 IST2025-09-01T11:54:41+5:302025-09-01T11:56:35+5:30
SCO Summit China: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससीओ शिखर परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
SCO Summit China: चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) शिखर परिषद होत आहे. यादरम्यान, सर्व राष्ट्रप्रमुखांच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानचे नाव न घेता टीका केली. तसेच, अमेरिकेलाही त्यांच्या संरक्षणवादी, एकतर्फी आणि वर्चस्ववादी वृत्तीबद्दल फटकारले.
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख
पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीवाद ही मोठी आव्हाने आहेत. दहशतवाद हे संपूर्ण मानवतेसाठी एक सामान्य आव्हान आहे. कोणताही देश, कोणताही समाज त्यापासून स्वतःला सुरक्षित मानू शकत नाही, म्हणून भारताने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकतेवर भर दिला आहे.
Sharing my remarks during the SCO Summit in Tianjin. https://t.co/nfrigReW8M
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2025
SCO ने देखील यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. या वर्षी भारताने संयुक्त माहिती ऑपरेशन्सचे नेतृत्व करून दहशतवादी संघटनांशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याविरुद्ध आवाज उठवला आहे. यावर तुमच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या ४ दशकांपासून भारत दहशतवादाने त्रस्त आहे. इतकी लोक गमावली गेली. इतकी मुले अनाथ झाली. अलिकडेच, पहलगाममध्ये दहशतवादाचे एक अतिशय घृणास्पद रूप आपण पाहिले आहे.
या दुःखाच्या वेळी आपल्यासोबत उभ्या राहिलेल्या मित्र राष्ट्रांचे मी आभार मानतो. हा हल्ला मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देश आणि व्यक्तीसाठी एक उघड आव्हान होता. काही देशांकडून दहशतवादाला उघड पाठिंबा देणे, आपल्याला स्वीकार्य असू शकते का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आपल्याला स्पष्टपणे आणि एका आवाजात सांगावे लागेल की, दहशतवादाबद्दल कोणतेही दुहेरी निकष स्वीकार्य राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया पीएम मोदींना दिली.
भारताचे SCO बद्दल काय मत आहे?
आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील १.४ अब्ज जनतेच्या वतीने मी सर्व नेते आणि प्रतिनिधींचे मनापासून अभिनंदन करतो. सहा सदस्यांपासून सुरू झालेली संघटना आज दहा सदस्यांपर्यंत विस्तारली आहे. हे जगातील जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रादेशिक स्थिरता, सुरक्षा आणि समृद्धीला चालना देण्यासाठी भारत या संघटनेच्या भूमिकेसाठी वचनबद्ध आहे.
गेल्या २४ वर्षात SCO ने आशिया प्रदेशात सहकार्य आणि परस्पर संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतानेही नेहमीच सक्रिय सदस्य म्हणून सकारात्मक भूमिका बजावली आहे. SCO बद्दल भारताचे विचार आणि धोरण तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे, ज्यामध्ये सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी यांचा समावेश आहे, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.