सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 08:35 IST2025-10-25T08:34:04+5:302025-10-25T08:35:13+5:30
India Vs Pakistan: किरियाकू यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अब्जावधी डॉलर्सची मदत देऊन विकत घेतले होते.

सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट
नवी दिल्ली: अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांबद्दल सीआयएचे माजी अधिकारी जॉन किरियाकू यांनी एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. अमेरिकेला हुकूमशाहांसोबत काम करायला आवडते, कारण तिथे जनता किंवा माध्यमांचा दबाव नसतो. आम्ही मुशर्रफना विकत घेतले होते आणि ते आम्हाला पाकिस्तानात आमच्या मर्जीप्रमाणे काम करू देत होते, असा दावा किरियाकू यांनी केला आहे.
किरियाकू यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अब्जावधी डॉलर्सची मदत देऊन विकत घेतले होते. इतकेच नव्हे, तर एका वेळी अमेरिकेचे पाकिस्तानच्या अणुबॉम्बवर प्रत्यक्ष नियंत्रण होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. जॉन किरियाकू, ज्यांनी सीआयएमध्ये १५ वर्षे काम केले आणि पाकिस्तानात दहशतवादविरोधी कारवाया हाताळल्या, त्यांच्या मते मुशर्रफ हे भारतासोबत डबल गेम खेळत होते.
किरियाकू म्हणाले, "अमेरिकेला हुकूमशाहांसोबत काम करायला आवडते, कारण तिथे जनता किंवा माध्यमांचा दबाव नसतो. आम्ही मुशर्रफना विकत घेतले होते आणि ते आम्हाला पाकिस्तानात आमच्या मर्जीप्रमाणे काम करू देत होते."
पाकिस्तानी लष्कराचा खरा शत्रू 'भारत'च...
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मुशर्रफ अमेरिकेला मदत करत असल्याचा दिखावा करत होते, पण दुसरीकडे पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवादी गट भारताविरुद्ध सक्रिय राहिले. पाक सैन्याला अल-कायदाची पर्वा नव्हती; त्यांची खरी चिंता भारत होता. मुशर्रफ जगाला अमेरिकेला साथ देत असल्याचे दाखवत होते, पण पडद्याआड ते भारताच्या विरोधात कारवाया करत होते, असे किरियाकू यांनी स्पष्ट केले.
एक्यू खानला सौदीने वाचविले...
अमेरिका पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांच्यावर कारवाई करणार होती. परंतु सौदी अरेबियाने आम्ही त्याच्यासोबत काम करत आहोत, असे सांगितल्याने आम्ही तिथेच थांबलो. इस्रायलसारखा विचार केला असता तर एक्यू खानला कधीच संपविले असते, असाही दावा त्यांनी केला आहे.