Saudi Arabia Bus Accident, lone survivor: सौदी अरबमधील मक्का-मदीना महामार्गावर झालेल्या अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. पण या अपघातात २४ वर्षीय मोहम्मद अब्दुल शोएब (Abdul Shoeb Mohammed) हा एकमेव प्रवासी बचावला. त्याला झोप येत नव्हती, तर इतर सर्व ४५ प्रवासी गाढ झोपेत होते. या एका कारणामुळे तो वाचल्याचे निष्पन्न झाले. शोएबला झोप येत नसल्याने तो ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर गेला आणि वेळ घालवण्यासाठी त्याच्याशी गप्पा मारत होता. तो जागा राहिला आणि त्यामुळेच त्याचा एकट्याचा जीव वाचला, असे सांगितले जात आहे.
अपघात झाला तेव्हा शोएब आणि बसचालकाने बसमधून उडी मारली. ऑइल टँकरला धडकल्यानंतर बसने पेट घेतला आणि त्यात ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. उर्वरित प्रवासी झोपले होते आणि त्यांना बाहेर पडता आले नाही, कारण आगीने क्षणार्धात बसला वेढले. पण शोएब मात्र कसाबसा या अपघातातून एकटा बचावला.
नामपल्ली येथील हज हाऊसमध्ये माहितीची वाट पाहत असलेले शोएबचे जवळचे नातेवाईक मोहम्मद तहसीन म्हणाले, "आम्हाला सकाळी ५:३० च्या सुमारास शोएबचा फोन आला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की तो कसाबसा अपघातातून बचावला आहे. पण इतर सर्वजण आगीत अडकले आहेत. नंतर, आम्हाला कळविण्यात आले की त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यामुळे आम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकलो नाही."
शोएबच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू
हैदराबादमधील झिर्राह येथील नटराजनगर कॉलनीतील रहिवासी शोएब, त्याचे पालक अब्दुल कादीर (५६) आणि गौसिया बेगम (४६), त्याचे आजोबा मोहम्मद मौलाना आणि त्याच्या काकाच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांसह सौदी अरेबियाला गेला होता. त्याचा नातेवाईक तहसीन म्हणाला, "त्याच्या परिसरातील आणखी चार लोक मक्का येथे राहिले होते. अपघातानंतर लगेचच शोएबने त्यापैकी एकाला फोन करून अपघाताबद्दल सांगितले. शोएबने बसमधून उडी मारल्याने तो जखमी झाला आणि सध्या तो मदिना येथील जर्मन रुग्णालयात दाखल आहे असेही त्याने कळवले. त्यामुळे आम्हाला कळले."
मक्काहून यात्रेकरू मदीनाला जात होते...
यात्रेकरूंनी मक्का येथे उमराहचे विधी पूर्ण केले होते आणि अपघात झाला तेव्हा ते बसने मदीनाला जात होते. सर्व मृत हैदराबादचे आहेत. यात्रेकरूंचे नातेवाईक बसमध्ये असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हज हाऊसमध्ये गेले. काही जण आशेने ट्रॅव्हल ऑपरेटर आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. पण शोएब वगळता कोणताही भारतीय प्रवासी वाचला नाही.
Web Summary : A Saudi Arabia bus crash killed 42 Indian pilgrims. Shoeb, 24, survived because he was awake, talking to the driver. He and the driver jumped before the bus burst into flames. All other passengers perished.
Web Summary : सऊदी अरब में एक बस दुर्घटना में 42 भारतीय तीर्थयात्रियों की मौत हो गई। शोएब, 24, बच गया क्योंकि वह जगा हुआ था, ड्राइवर से बात कर रहा था। बस में आग लगने से पहले वह और ड्राइवर कूद गए। अन्य सभी यात्री मारे गए।