'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:20 IST2025-12-31T18:18:19+5:302025-12-31T18:20:26+5:30
या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तिथे उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या काही नेत्यांनाही भेटले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्यावर ढाका येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही हजर होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खालिदा जिया यांचा मुलगा आणि बांगलादेशच्या नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारीक रहमान यांची सांत्वन भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी खालिदा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठवण्यात आलेले शोक पत्रही त्यांच्या हाती देण्यात आले.
या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तिथे उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या काही नेत्यांनाही भेटले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तान यांच्यातील नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानी नेते सरदार अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन केले. ते पाकिस्तानी संसदेत नॅशनल असेंबली स्पीकर आहेत. ही एक अनौपचारिक भेट होती, ज्यात दोन्ही नेते एकमेकांना भेटले. दोघांमध्ये कुठलीही अन्य चर्चा झाली नाही. या फोटोबाबत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आले नाही.
Sardar Ayaz Sadiq, Speaker of the National Assembly of Pakistan, exchanges greetings with Indian External Affairs Minister S. Jaishankar in Dhaka on Wednesday ahead of the funeral programme of former Bangladesh Prime Minister Khaleda Zia. pic.twitter.com/1eLz0i8nAi
— Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) December 31, 2025
कोण आहे सरदार अयाज सादिक?
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे ज्या पाकिस्तानी नेते सरदार अयाज यांना भेटले ते पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे निकटवर्तीय मानले जातात. अयाज यांनी बालकोट स्ट्राइकवर तेव्हाचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह महमूद यांची खिल्लीही उडवली होती. जर भारतीय पायलट अभिनंदनची सुटका केली नसती तर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला असता असं महमूद म्हणाले होते.
दरम्यान, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांना ढाका येथील माणिक मियाँ अव्हेन्यू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इतर देशांतील मान्यवर नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारी ३:३० वाजता त्यांचे पती, दिवंगत राष्ट्रपती आणि स्वातंत्र्यसैनिक झियाउर रहमान यांच्या कबरीशेजारी पूर्ण राजकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिया तीन वेळा बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून काम केले आणि बीएनपीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम केले. दीर्घ आजाराने त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी ढाका येथे निधन झाले.