Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:43 IST2025-11-20T11:41:29+5:302025-11-20T11:43:21+5:30
Russia Ukraine News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करूनही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच आहे. रशियाने युक्रेनच्या आणखी एका शहरावर ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. यात कमीत कमी २५ लोक मारले गेले आहेत.

Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
Latest Russia Ukraine News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिष्टाई आणि धमक्यांना लाथाडत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या पश्चिमेला असलेल्या तर्नोपील शहरावर ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात कमीत कमी २५ लोक मारले गेले आहेत.
युक्रेनमधील मदत व बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाकडून दोन रहिवाशी इमारतींनाच लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात ७३ लोक जखमी झाले असून, त्यात १५ लहान मुलांचा समावेश आहे. २५ लोकांचा मृत्यू झाला असून, यात लहान मुलांचाही समावेश आहे.
रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने केलेल्या भयंकर हल्ल्यांपैकी हा एक हल्ला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिमेला असलेल्या लवीव आणि इवानो फ्रँकिवस्क येथेही रशियाने हल्ले केले आहेत.
युक्रेनच्या उत्तरेला असलेल्या खारकीव्हमधील तीन ठिकाणांनाही ड्रोन हल्ल्यांनी लक्ष्य करण्यात आले आहे. यात ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. लवीवचे प्रमुख म्हणाले, एनर्जी फॅसिलिटी केंद्राचे या हल्ल्यामुळे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केले गेले आहेत. यात इमारती आणि वाहनांने जळत असल्याचे दिसत आहे.
युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, रशियाच्या ४७६ ड्रोन्सपैकी ४४२ ड्रोन्स आणि ४८ पैकी ४१ मिसाईल हवेतच पाडल्या.