Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:44 IST2025-08-18T15:44:08+5:302025-08-18T15:44:22+5:30
Russia-Ukraine War : युक्रेनमचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेला शांतता चर्चेसाठी गेले आहेत.

Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
Russia-Ukraine War : तीन वर्षापासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केलेत. दोन दिवसापूर्वी अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की शांतता चर्चेसाठी अमेरिकेत पोहोचले आहेत. झेलेन्स्की अमेरिकेत पोहोचताच इकडे रसियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या एका इमारतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला.
सोमवारीही रशियाने खार्किवमधील पाच मजली इमारतीवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात किमान पाच जण ठार झाले असून यामध्ये अनेकजण जखमी झाले. ड्रोन हल्ल्यानंतर इमारतीचा एक भाग कोसळला. या इमारतीला आगही लागली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने इमारतीवर चार ड्रोन हल्ले केले. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये इमारतीचा ढिगारा हटवण्याचे आणि लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. एका मजल्यावर आग लागली आहे. मृतांमध्ये दीड वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
१८ जण गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान १८ जण जखमी झाले, यामध्ये काही मुलांचा समावेश आहे. रशियन सीमेजवळील एका शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्लाही झाला. यामध्ये ११ जण जखमी झाले. अमेरिकेत पोहोचण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला क्रिमिया सोडावे लागेल असे म्हटले आहे. याशिवाय, युक्रेन नाटोचा भाग बनू शकणार नाही. या विधानामुळे झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
पुन्हा बैठकीत वादाची शक्यता
ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान झालेल्या संघर्षाची आठवण ठेवून, यावेळी युरोपीय नेते देखील युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांसह अमेरिकेत आले आहेत. शनिवारी डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची अलास्कामध्ये भेट झाली. बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी कोणत्याही ठोस निकालाबद्दल काहीही सांगितले नाही.