रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 19:02 IST2025-11-16T19:00:57+5:302025-11-16T19:02:01+5:30
Russia Ukraine War: शांततापूर्ण चर्चेचा मार्ग मोकळा होणार?

रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धाला तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. दोन्ही देशांकडून सातत्याने एकमेकांवर हल्ले सुरू अशतात. अशातच, दोन्ही देशांनी पुन्हा एकदा युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी सहमती दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, सुमारे 1,200 युक्रेनियन कैद्यांची सुटका करण्यासाठी अदलाबदलीची प्रक्रिया सुरू करण्याचे काम सुरू आहे.
झेलेन्स्कींची ‘एक्स’ पोस्ट
झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, आम्हाला युद्धकैद्यांच्या अदलाबदलीची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, असा विश्वास आहे. यासाठी अनेक महत्त्वाच्या बैठका, चर्चा आणि दूरध्वनीवरून संवाद सुरू आहेत. महिनोनमहिने रशियन तुरुंगांत कैद असलेल्या युक्रेनियन सैनिकांना व नागरिकांना परत आणण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
We are working to ensure another start to negotiations, so that after all there is a prospect to end this war. We are also counting on the resumption of POW exchanges – many meetings, negotiations, and calls are currently taking place to ensure this. I thank everyone who is…
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) November 16, 2025
तुर्की आणि यूएईची मध्यस्थी
युक्रेनचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख रुसतम उमेरोव यांनी शनिवारी माहिती दिली की, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी अदलाबदलीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. तुर्कीच्या मध्यस्थीमुळे 1,200 युक्रेनियन कैद्यांची सुटका करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. रशियाने या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, मॉस्को सर्व प्रस्तावांचा विचार करीत आहे.
50 हजारांहून अधिक युक्रेनियन सैनिकांचा बळी
युक्रेन-रशिया युद्धाला आता 1,361 दिवस पूर्ण झाले असून संघर्ष अत्युच्च टप्प्यावर पोहोचला आहे. जून 2022 पासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त युक्रेनियन सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत, तर हजारो जणांना कैद करण्यात आले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, मानवीय आधारावरील ही अदलाबदली भविष्यातील शांततापूर्ण चर्चेचा मार्ग मोकळा करू शकते. मात्र डोनबास प्रदेशावरील पूर्ण नियंत्रणाची रशियाची मागणी अजूनही मोठा अडथळा ठरते आहे.
ओडेसामध्ये रशियाचे ड्रोन हल्ले
दरम्यान, युक्रेनच्या दक्षिण ओडेसा प्रांतात रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य आपत्कालीन सेवांच्या माहितीनुसार, एका सौर ऊर्जा प्रकल्पासह अनेक महत्त्वाच्या संरचना उद्ध्वस्त झाल्या असून, वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू तसेच 17 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की, ओडेसा परिसरातून येणारे 57 युक्रेनियन ड्रोन हल्ले त्यांनी निष्फळ केले.