पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 20:06 IST2025-07-07T20:05:35+5:302025-07-07T20:06:13+5:30
Russia News: रशियातील दिग्गज नेते रोमन स्टारोवोइट यांचा राहत्या घरात मृतदेह सापडला आहे.

पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
Russia News:रशियातील दिग्गज नेते रोमन स्टारोवोइट (Roman Starovoit) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांची काही तासांपूर्वीच मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. स्टारोवोइट हे रशियन सरकारमधील वाहतूक विभागाचे प्रमुख होते. आता त्यांचा मृतदेह आढळल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक रशियन माध्यमांनुसार, रोमन स्टारोवोइट यांना काही तासांपूर्वीच मंत्रिपदावरुन बाजुला काढले होते. आता राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला आहे. स्टारोवोइट यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूक देखील सापडली असून, त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या नेत्याने आत्महत्या केल्याने वेगळीच शंकाही उपस्थित केली जात आहे. सध्या रशियन पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वर्षभरापूर्वीच मंत्री झाले
मिळालेल्या माहितीनुसार, स्टारोवोइट यांना एका वर्षापूर्वी व्लादिमीर पुतिन यांनी मंत्रीपद दिले होते, परंतु कामातील निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना आज अचानक पदावरुन काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागी आंद्रेई निकितिन हे रशियाचे नवे वाहतूक मंत्री असतील.
स्टारोव्होइट रस्ते बांधणीत तज्ज्ञ होते
स्टारोव्होइट हे रशियातील पायाभूत सुविधांच्या विकासाचे नेते मानले जाते. स्टारोव्होइट यांनी रशियामध्ये रस्त्यांचे जाळे बांधले होते. ते २०१२ ते २०१८ पर्यंत फेडरल रोड एजन्सीचे प्रभारी होते. त्यांच्या कामावर खूश होऊन पुतिन यांनी त्यांना कुर्स्क प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. स्टारोव्होइट राज्यपाल असताना युक्रेनने रशियातील कुर्स्क ताब्यात घेतले, त्यामुळे पुतिन त्यांच्यावर नाराज होते.
युद्ध सुरू झाल्यावर त्यांना पुन्हा केंद्रीय राजकारणात बोलावण्यात आले. प्रथम त्यांना उपपरिवहन मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली, नंतर त्यांना बढती मिळाली. मात्र आता ज्या पद्धतीने त्यांच्याकडून खुर्ची काढून घेण्यात आली, त्यावरुन स्टारोव्होइटची कारकीर्द संपल्याचे बोलले जात होते.