Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 20:12 IST2025-12-31T20:11:04+5:302025-12-31T20:12:36+5:30
Russia Ukraine War: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्यावरून रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे.

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या आरोपावरून रशिया आणि युक्रेनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. युक्रेनने पुतिन यांच्या निवासस्थानावर एकाच वेळी अनेक दिशांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा रशियाने केला असून, त्याचे पुरावे म्हणून रशियाने बुधवारी काही व्हिडिओ आणि नकाशा जारी केला आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या फुटेजमध्ये, एका बर्फाच्छादित भागात युक्रेनियन ड्रोनचे अवशेष विखुरलेले दिसत आहेत. काळ्या रंगाच्या या ड्रोनचे भाग दिसत असून, रशियाच्या दाव्यानुसार या प्रत्येक ड्रोनमध्ये साधारण ६ किलो स्फोटके भरलेली होती. हा हल्ला पुतिन यांना लक्ष्य करण्यासाठी अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आला होता, असेही रशियाने म्हटले आहे.
रशियाने युक्रेनच्या लांब पल्ल्याच्या ड्रोनचा मार्ग दर्शवणारा एक विशेष नकाशा प्रसिद्ध केला आहे. या नकाशाद्वारे रशियाने दावा केला आहे की, युक्रेनने विविध ठिकाणांहून एकूण ९१ ड्रोन रशियाच्या दिशेने डागले. रशियाने ४९ ड्रोन पाडले. नोव्हगोरोड भागात ४१ आणि स्मोलेन्स्कमध्ये १ ड्रोन पाडण्यात आले.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला असला तरी, राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. हा हल्ला अयशस्वी ठरला असला तरी रशियाने याला थेट आव्हान मानले असून, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.