अलास्का : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे झालेली बैठक कोणत्याही निकालाशिवाय संपल्याचे मानले जात आहे. अर्थात ही बैठक अयशस्वी झाल्याचे मानले जात आहे. मात्र, यानंतर आता भारतासाठी अडचण वाढण्याची शकता आहे. या दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धावर तीन तासांहून अधिक वेळ चर्चा केली. मात्र, युद्धविरामासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही करार झालेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बैठक अतिशय 'प्रोडक्टिव्ह' असल्याचे म्हटले आहे, तर व्लादिमीर पुतिन यांनी ही बैठक काही समाधानाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. यावेळी, पुढील बैठक मॉस्कोमध्ये व्हावी, असे म्हणत पुतिन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आश्चर्यचकित केले. ट्रम्प म्हणाले, आपण लवकरच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी चर्चा करू. मात्र, भारताचा विचार करता, अलास्का बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, 'रशियाने एक मोठा तेल ग्राहक गमावला...' असा दावा केला आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ? -फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हटले, "रशियाने एक मोठा तेल ग्राहक गमावला आहे, तो म्हणजे भारत. भारत, रशियाच्या तेल व्यापाराचा ४०% एवढा मोठा भाग सांभाळून घ्यायचा. जर मी आता सेकेंडरी निर्बंध लादले, तर हे त्यांच्यासाठी मोठे विनाशकारी ठरेल." मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे, भारताने रशियाकडून तेल आयात करणे थांबवलेले नाही. अजूनही रशियन तेल खरेदी केले जात आहे.
तत्पूर्वी, जर पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी ठरली, तर भारतावरील टॅरीफ अथवा कर आणखी वाढवला जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीपूर्वी म्हटले होते. यामुळे आता, बैठक अयशस्वी झाल्याचे मानले जात असताना, अमेरिका भारतावरील टॅरीफ आणखी वाढवणार का? अशा प्रश्न निर्माण होत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारताच्या एकूण तेल आयातीपैकी सुमारे ३५-४०% तेल रशियाकडून आयात होते.