रशिया युद्धाला पूर्ण पाठिंबा! किम जोंग उन यांनी दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 06:27 AM2023-09-14T06:27:20+5:302023-09-14T06:27:55+5:30

Kim Jong Un :

Russia fully supports the war! Kim Jong Un promised | रशिया युद्धाला पूर्ण पाठिंबा! किम जोंग उन यांनी दिले आश्वासन

रशिया युद्धाला पूर्ण पाठिंबा! किम जोंग उन यांनी दिले आश्वासन

googlenewsNext

सोल : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष  व्लादिमीर पुतिन यांची भेट घेत युक्रेन युद्धाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. आमचा देश ‘साम्राज्यवादविरोधी’ रशियाच्या पाठीशी सदैव उभा राहील. उत्तर कोरियाचे रशियासोबतचे संबंध ‘प्रथम प्राधान्य’ असल्याचे  किम जोंग उन यांनी म्हटले आहे.

किम यांचे स्वागत करून पुतिन म्हणाले, किम रशिया भेटीवर आल्याने आनंद झाला. आर्थिक सहकार्य, मानवतावादी मुद्दे आणि ‘प्रदेशातील परिस्थिती’ हे मुद्दे चर्चेत अजेंड्यावर होते, असे सांगण्यात आले.

भेटीपूर्वी  समुद्रात डागली दोन क्षेपणास्त्रे 
किम जोंग उन आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट होण्यापूर्वीच उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी समुद्राच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे डागली. उत्तर कोरियाने डागलेली क्षेपणास्त्रे कुठपर्यंत पोहोचली हे दक्षिण कोरियाने स्पष्ट केले नाही. उत्तर कोरियाने २०२२ च्या सुरुवातीपासून पुन्हा शस्त्रास्त्रांची चाचणी तीव्र केली आहे.

शस्त्रे पुरवल्याचा आरोप
अमेरिकेने उत्तर कोरियावर रशियाला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला आहे, ज्यात रशियाच्या खासगी लष्करी वॅगनर ग्रुपला तोफगोळे विकल्याचाही समावेश आहे. रशियन आणि उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी अशा दाव्यांचा इन्कार केला.

पंतप्रधान मोदींची स्तुती
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, देशांतर्गत उद्योगांना पुढे नेण्यासाठी आपला देश भारतासारख्या मित्र देशाच्या यशाचे अनुकरण करू शकतो. आठव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. 

द. कोरिया सावध
दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिम सू-सुक यांनी सांगितले की, आम्ही किम यांच्या भेटीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही संयुक्त राष्ट्र सदस्य देशाने उ. कोरियाविरुद्धच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांचे उल्लंघन करू नये. बैठकीत जगाची  शांतता बिघडवणारी कोणतीही गोष्ट असू नये, असे त्यांनी सांगितले.

नेमकी भेट का? 
- किम यांना उपग्रह विकसित करण्यासाठी रशियाकडून मदत हवी.
-  या भेटीमुळे अण्वस्त्र क्षेपणास्त्र क्षमता वाढण्यास मदत होण्यास उत्तर कोरियाला विश्वास आहे.
- आर्थिक व लष्करी तंत्रज्ञानाची मागणी उत्तर कोरिया करणार.
- १८ महिन्यांच्या युद्धामुळे कमी झालेला दारूगोळ्याचा साठा भरून काढण्याची संधी रशियाला आहे.

Web Title: Russia fully supports the war! Kim Jong Un promised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.