अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 05:41 IST2025-10-24T05:40:07+5:302025-10-24T05:41:08+5:30
युरोपियन संघही निर्बंध लादणार, गेल्या आठवड्यात ब्रिटनने याच दोन कंपन्यांवर निर्बंध घातले होते.

अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्ध तातडीने थांबावे म्हणून गुरुवारी अमेरिकेने रशियाच्या रॉसनेफ्ट व ल्यूकऑइल या दोन बड्या तेल कंपन्यांवर निर्बंध घातले. या निर्बंधाचे युक्रेनने व युरोपियन युनियनने स्वागत केले आहे.
गेल्या आठवड्यात ब्रिटनने याच दोन कंपन्यांवर निर्बंध घातले होते. आता युरोपियन युनियनने रशियाकडून येणाऱ्या नैसर्गिक वायू आयातीवर निर्बंध आणण्याचे ठरवले आहे. रशियाने मात्र अमेरिकेच्या निर्णयावर नापसंती दाखवत याने मूळ प्रश्न सुटणार नाही. हा निर्णय किरकोळ आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय तेल आणि शेअर बाजारात संमिश्र पडसाद उमटले. तेलाच्या प्रतिबॅरल किंमती दोन डॉलरने वधारल्या. एस अँड पी व डाऊ जोन्स निर्देशांकात ०.१ % इतकीच वाढ झाली. जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, जपान, हाँगकाँग. द. कोरिया येथील शेअर बाजारात किरकोळ प्रतिसाद दिसला. चिनी कंपन्यांचे समभाग मात्र वधारले. मात्र याचे कारण चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केलेले पाच वर्षाचे धोरण आहे.
युरोपियन युनियनची ब्रुसेल्समध्ये बैठक सुरू
रशियाच्या तेलकंपन्यांवर निर्बंध घालण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे युरोपियन युनियनने स्वागत केले आहे. ब्रुसेल येथे त्यांची बैठक होत असून या बैठकीत युरोपमध्ये रशियाची जेवढी मालमत्ता आहे ती किमान दोन वर्षांसाठी गोठवावी. तसेच २७ युरोपीय देशांमध्ये रशियन राजदूतांच्या हालचालींवर मर्यादा आणण्याचाही विचार आहे.