निवासी इमारती पत्त्याच्या पानांसारख्या जळाल्या, ४४ जणांचा मृत्यू, ३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:47 IST2025-11-27T11:27:29+5:302025-11-27T11:47:01+5:30
हाँगकाँगमधील निवासी इमारतींमध्ये लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या इमारती १९८० च्या दशकात बांधल्या होत्या. सध्या त्यांचे नूतनीकरण सुरू आहे.

निवासी इमारती पत्त्याच्या पानांसारख्या जळाल्या, ४४ जणांचा मृत्यू, ३ जणांना अटक
बुधवारी हाँगकाँगमधील काही गगनचुंबी इमारतींना भीषण आग लागली, या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. ताई पो जिल्ह्यातील वांग चुक कोर्ट नावाच्या गृहनिर्माण संकुलात लागलेल्या आगीत मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला आहे. याशिवाय, २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत, तर अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेला जबाबदार असलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही या घटनेची दखल घेतली आहे आणि मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करताना बचावकार्याला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी सांगितले की, आग लागलेल्या इमारती १९८० च्या दशकात बांधल्या गेल्या होत्या. या २००० अपार्टमेंटमध्ये सुमारे ४,००० लोक राहत होते, ज्यात वृद्ध रहिवाशांचा समावेश होता. काही काळापासून नूतनीकरणाचे काम सुरू होते, यामुळे सर्व इमारतींभोवती तेल रंग आणि बांबूचे मचान पसरले होते. यामुळे आग वेगाने पसरली आणि सात इमारतींना वेढले.
घटनेनंतर अग्निशमन दलाच्या पथके घटनास्थळी पोहोचली, पण तोपर्यंत आगीने अनेक जण जळून खाक झाले होते. रात्री उशिरापर्यंत केलेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या ७०० हून अधिक लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी एक पथक तयार केले आहे.
या घटनेनंतर, पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या आणि नूतनीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीतील दोन संचालक आणि एका अभियंत्याला अटक केली. त्यांच्यावर सामूहिक हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.