खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये सरकारविरोधात लोक रस्त्यावर का उतरले? कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:42 IST2026-01-01T15:41:47+5:302026-01-01T15:42:17+5:30
Protests in Iran: देशभरात सलग चौथ्या दिवशी सरकारविरोधी निदर्शने सुरू आहेत.

खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये सरकारविरोधात लोक रस्त्यावर का उतरले? कारण काय..?
Protests in Iran: बांग्लादेश आणि नेपाळप्रमाणेइराणमध्येही सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत. देशभरात सलग चौथ्या दिवशी सरकारविरोधी निदर्शने सुरू असून, ही आंदोलने आता उग्र स्वरुप धारण करताना दिसत आहेत. रस्त्यांवर उतरलेले नागरिक थेट इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक आणि महिलांचा सहभाग असून, 2022 मध्ये महसा अमीनीच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनानंतरचे हे सर्वात मोठे जनआंदोलन मानले जात आहे.
चौथ्या दिवशी आंदोलनाला हिंसक वळण
दक्षिण इराणमधील फार्स प्रांतातील फासा शहरात आंदोलकांनी सरकारी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. फासा येथील गव्हर्नरेट कार्यालयाचे गेट तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याशिवाय, खुजेस्तान प्रांतातील रामहोर्मोज शहरात स्थानिक गव्हर्नरशिपवर ताबा मिळवल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी तर सरकारी कार्यालयांना आग लावण्याचे प्रयत्न झाल्याचेही सांगितले जात आहे.
असदाबाद शहरात तर सुरक्षा दलांच्या IRGC बासिज फोर्स च्या तळावरही हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.
Iran 🇮🇷 : third day of widespread protests and strikes.
— Ibex (@Umberto92494946) December 31, 2025
The Persian are not afraid, not anymore!
The fear that once silenced dissent is fading fast.
A recurring chant echoing through crowds is "Don't be afraid, don't be afraid—we are all together". pic.twitter.com/BV4UKMcWcD
लोक रस्त्यावर का उतरले?
या आंदोलनाची सुरुवात राजधानी तेहरान येथून झाली. सर्वप्रथम दुकानदारांनी निषेध व्यक्त करत दुकाने बंद ठेवली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणी चलन ‘रियाल’ ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून, हाच या आंदोलनांचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. यानंतर ही आंदोलने देशभर पसरली. तेहरानमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली, तर इस्फहान, यज्द आणि जंजान येथील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्येही असंतोष व्यक्त करण्यात आला.
महागाईने कंबर मोडली
इराणची अर्थव्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबरमध्ये देशातील महागाई दर तब्बल 42.2 टक्के इतका होता. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वर्षभरात सुमारे 72 टक्क्यांनी वाढल्या आहेत. औषधे आणि आरोग्य सेवांच्या खर्चात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या सर्वांवर कळस म्हणजे, इराणी रियाल घसरून एका अमेरिकन डॉलरमागे सुमारे 14.2 लाख रियाल या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. या परिस्थितीमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून, अनेक शहरांमध्ये मोबाइल व इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
पाणीकपातही आंदोलनामागील मोठे कारण
महागाईव्यतिरिक्त, इराणमध्ये तीव्र पाणीकपातही जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. एका अहवालानुसार, देशातील 20 हून अधिक प्रांत अनेक महिन्यांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जात आहेत. ही समस्या केवळ 2025 पुरती मर्यादित नसून, गेल्या सहा वर्षांपासून ईरान दुष्काळाच्या झळा सोसत आहे. राजधानी तेहरानमध्येही पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
सरकारची भूमिका काय?
या आंदोलनांवर इराणी सरकारने संयमाची भूमिका घेतल्याचे सांगितले आहे. सरकारी प्रवक्त्या फातेमेह मोहाजेरानी यांनी स्पष्ट केले की, “सरकार शांततापूर्ण आंदोलनांचा आदर करते. संविधानाने दिलेल्या शांततेत एकत्र येण्याच्या अधिकाराला आम्ही मान्यता देतो. लोकांचा आवाज ऐकणे हे सरकारचे कर्तव्य आहे.” मात्र, सरकारने हेही स्पष्ट केले आहे की हिंसा आणि अराजकता कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.
खामेनेईंच्या सत्तेला धोका?
देशभर पसरलेल्या या आंदोलनांमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की, आता आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या सत्तेला खरोखर धोका आहे का? सध्याच्या परिस्थितीत तात्काळ सत्ताबदल होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. कारण इराणमध्ये केवळ सरकारच नव्हे, तर रिव्होल्यूशनरी गार्ड, सुरक्षा यंत्रणा आणि धार्मिक संस्थांचेही मजबूत नियंत्रण आहे. तरीही, व्यापारी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक एकत्र रस्त्यावर उतरल्याने शासनासमोर एक गंभीर राजकीय आणि सामाजिक आव्हान उभे राहिले आहे.