अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 23:21 IST2026-01-09T22:59:50+5:302026-01-09T23:21:57+5:30
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या अलीकडच्या आक्रमक कारवायांमुळे चीन आणि रशिया संतापले आहेत.

अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
दक्षिण आफ्रिकेच्या समुद्रात सध्या जगातील ३ बड्या महाशक्ती एकत्र आल्या आहेत. चीन, रशिया आणि इराणची खतरनाक युद्धनौका केप टाऊनजवळ पोहचल्या आहेत. हे सर्व देश ब्रिक्स समुहाच्या सामुहिक नौदलाचा सराव विल फॉर पीस २०२६ मध्ये भाग घेत आहेत. हा अभ्यास अशावेळी सुरू आहे जेव्हा जगात व्हेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केला आहे. अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने मादुरो यांना अटक केली. त्याशिवाय अमेरिकेने तिथले तेल टँकरही जप्त केले आहेत. ट्रम्प प्रशासनाने याआधीच ब्रिक्सला अमेरिकेच्या विरोधातील संघटना म्हटलं आहे. त्यात आता ब्रिक्स देश चीनच्या नेतृत्वात अभ्यास करत आहे. या संपूर्ण घटनेकडे अमेरिका डोळे लावून आहे.
केपटाऊनच्या किनाऱ्यावर या देशांची हजेरी याकडे एक मोठा राजनैतिक संदेश म्हणून पाहिलं जात आहे. व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या अलीकडच्या आक्रमक कारवायांमुळे चीन आणि रशिया संतापले आहेत. हे देश आता त्यांच्या नौदलाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करत आहेत. ब्रिक्सकडे स्वतःची लष्करी शक्ती देखील आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी चीन या संपूर्ण सरावाचे नेतृत्व करत आहे. ट्रम्प यांनी ब्रिक्सचे वर्णन 'अमेरिकाविरोधी' असं केलं आहे. अशा परिस्थितीत हा सराव आगीत तेल ओतू शकतो. २०२४ मध्ये इराण देखील या गटात सामील झाला. आता तोही आपले बळ वाढवत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा सिमन्स टाउन तळ सध्या युद्धभूमीसारखा दिसत आहे. हिंद महासागर आणि अटलांटिक महासागर येथे एकत्र येतात. चिनी नौदलाचे १६१ मीटर लांबीचे विध्वंसक, तांगशान हे लक्ष केंद्रीत आहे. रशिया आणि इराणमधील आधुनिक जहाजे देखील येथे उभी आहेत. ही जहाजे पुढील शुक्रवारपर्यंत सागरी सुरक्षा सराव करतील त्यांना चाचेगिरीचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी प्रशिक्षण देतील. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेने या देशांचं स्वागत केले होते. आता हे सहकार्य आणखी खोलवर जात आहे. दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र धोरण अमेरिकेच्या डोळ्यात खूपत आहे. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फंडात कपात केली आहे. इराणसोबत असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे अमेरिका नाराज आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका स्वतःला एक "तटस्थ" देश मानतो. मात्र रशियन जहाजांच्या हजेरीमुळे अमेरिकेशी असलेले त्याचे संबंध ताणले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेतील विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक अलायन्स देखील या सरावांना विरोध करत आहे कारण सरकार निर्बंधित देशांशी लष्करी संबंध वाढवत आहे असा त्यांचा आरोप आहे. या सरावात एकूण ११ ब्रिक्स देशांचा समावेश आहे. परंतु अद्याप सर्व देशांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. संयुक्त अरब अमीरात आपली जहाजे पाठवण्याची अपेक्षा आहे. भारत, मिस्त्र आणि सौदी अरब यांच्या भूमिकेवर सस्पेन्स कायम आहे. हा युद्धसराव याआधी नोव्हेंबरला होणार होता परंतु जी २० शिखर संमेलनामुळे तो पुढे ढकलला. आता संपूर्ण जगाचं लक्ष याकडे लागले आहे.