Imran Khan: इम्रान खानचे राजकीय करिअर संपविण्याची तयारी; पक्षाचे अध्यक्ष पदही जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 18:11 IST2022-12-06T18:11:17+5:302022-12-06T18:11:57+5:30
इम्रान खान यांनी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर पाकिस्तानात नवा पक्ष उभा केला होता. गेल्या वेळच्या निवडणुकीत ते सत्तेवरही आले होते.

Imran Khan: इम्रान खानचे राजकीय करिअर संपविण्याची तयारी; पक्षाचे अध्यक्ष पदही जाणार?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे राजकीय करिअरच संपविण्याची तयारी सुरु झाली आहे. सत्ता गेल्यानंतर काही महिन्यांनी इम्रान खान यांची खासदारकीही निवडणूक आयोगाने रद्द केली. एवढ्यावर निवडणूक आयोग थांबत नसून इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्षपदही काढून घेण्याची तयारी सुरु केली आहे.
पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार पीटीआयच्या अध्यक्षपदावरून इम्रान खान यांना काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भेट मिळालेल्या वस्तू स्वत:च्या फायद्यासाठी विकल्याप्रकरणी इम्रान खान दोषी आढळले आहेत. यामुळे खान यांना खासदारकी गमवावी लागली आहे. तसेच ते कायमस्वरुपी निवडणूक लढवू शकणार नाही, अशी कारवाई देखील करण्यात येत आहे.
इम्रान खान यांनी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर पाकिस्तानात नवा पक्ष उभा केला होता. गेल्या वेळच्या निवडणुकीत ते सत्तेवरही आले होते. परंतू, नंतर त्यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील काही खासदार आणि मित्र पक्ष गेले आणि सत्ता गमवावी लागली होती. जर इम्रान खान यांना पीटीआयच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले तर त्यांच्या या राजकीय करिअरला तो सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. कारण त्यांना पक्षाचे नेतृत्व दुसऱ्या व्यक्तीच्या हाती सोपवावे लागणार आहे.
इम्रान खान यांना याची नोटीस पाठविण्यात आली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार इम्रान खान यांच्यावरील ही सुनावणी १३ डिसेंबरला होणार आहे. कोणताही कायदा कोणत्याही दोषी व्यक्तीला राजकीय पक्षाचा पदाधिकारी बनण्यापासून रोखत नाही, असे पीटीआयच्या नेत्यांचे म्हणणे आहे.