इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:53 IST2026-01-11T16:11:54+5:302026-01-11T16:53:16+5:30
इस्रायल आणि अमेरिकेच्या वाढत्या जवळीकीमुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढवू शकते. सध्यस्थिती पाहता, मध्य पूर्वेत नवीन संघर्षाची भीती निर्माण झाली आहे...

इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
इराणमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेमुळे इस्रायल अलर्ट मोडवर आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली सुरक्षा सल्लागारांनी या परिस्थितीसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पइराणला हस्तक्षेपाची धमकी देत आहेत. तसेच, निदर्शकांवर बळाचा वापर न करण्याचा इशाराही देत आहेत. दरम्यान, जून महिन्यात, इस्रायल आणि इराण यांच्यात १२ दिवसांचे युद्ध झाले होते. तेव्हा अमेरिकेने इस्रायलसोबत इराणवर हवाई हल्ले केले होते. यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा -
खरे तर, इस्रायल इराणच्या अणुकार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसंदर्भात चिंतेत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी फोनवरून चर्चा केली. इराणमध्ये अमेरिकेच्या संभाव्य हस्तक्षेपासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. एका इस्रायली सूत्राने यासंदर्भात माहिती दिली. याशिवाय, एका अमेरिकन अधिकाऱ्यानेही संभाषणाची पुष्टी केली आहे. मात्र, कशासंदर्भात चर्चा झाली, हे उघड केले नाहीत.
तर गंभीर परिणाम भोगावे लागतील -
दरम्यान, इराणने इस्रायलवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. तसेच, निदर्शनांचा उल्लेख करत, इराणमध्ये जे काही सुरू आहे, ते बघायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
इराणमध्ये निदर्शने -
सध्या, आर्थिक संकट आणि राजवटीविरुद्धच्या असंतोषामुळे इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. इंटरनेटवर बंदी असतानाही, निदर्शनांचे व्हिडिओ समोर येत आहेत. सुरक्षा दलांसोबत होणाऱ्या चकमकींचे व्हिडिओ समोर येत आहेत. निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत, सुरक्षा दलांशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. याचवेळी, ट्रम्प प्रशासनाकडून वारंवार हस्तक्षेपासंदर्भात भाष्य केले जात असल्याने इराणचे नेतृत्व अस्वस्थ आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या वाढत्या जवळीकीमुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढवू शकते. सध्यस्थिती पाहता, मध्य पूर्वेत नवीन संघर्षाची भीती निर्माण झाली आहे.