अजब ! कारमध्ये लपवून ठेवली होती चार हजार किलो संत्री, पोलिसांनी केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 13:32 IST2018-01-31T13:31:57+5:302018-01-31T13:32:20+5:30
पोलिसांनी कारवाई करत दोन कार जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या कारमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर चक्क संत्री लपवून ठेवण्यात आले होते.

अजब ! कारमध्ये लपवून ठेवली होती चार हजार किलो संत्री, पोलिसांनी केली जप्त
मॅड्रिड - स्पेन पोलिसांनी कारवाई करत दोन कार जप्त केल्या आहेत. पण धक्कादायक म्हणजे या कारमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर चक्क संत्री लपवून ठेवण्यात आले होते. हा सगळा चोरलेला माल असल्या कारणाने कारमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. पण जेव्हा पोलिसांनी कार उघडून पाहिलं तेव्हा मात्र त्यांचं डोकं चक्रावलं. कारण कारमध्ये एक-दोन किलो नाही तर चक्क चार हजार किलो संत्री होती. सेविल पोलिसांनी ही कारवाई केली असून, फोटो शेअर केले आहेत. युरोप प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरमोना शहरात 26 जानेवारीला पोलिसांनी ही कारवाई केली. चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांची कार गस्त घातलत असताना समोरुन जात असणा-या तीन गाड्यांनी अचानक रस्ता बदलल्याने पोलिसांना संशय आला. काही वेळ गाड्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांना अडवण्यात पोलिसांना यश आलं. एक कार दांपत्य चालवत होतं, तर दुसरी कार त्यांचा मुलगा चालवत होता. तिसरी टुरिझम कार होती, जी दोन भाऊ चालवत होते. पोलिसांनी गाडी उघडून पाहिली असता एका कारमधून संत्र्यांचा पाऊसच पडला. दुस-या कारमध्ये पिशव्यांमध्ये संत्री भरुन ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून, ही एवढी संत्री कोठून आली हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. चालकाने दावा केलाय की, आम्ही खूप लांबून प्रवास करत होतो. यावेळी आम्ही रस्त्यात दिसेल ते संत्री खाण्यासाठी म्हणून गाडीत भरत होतो. काही वेळानंतर पोलिसांना कॅरमोना येथे मोठ्या प्रमाणात संत्री चोरीला गेल्याची माहिती मिळाली. यानंतर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात आली.