पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 23:46 IST2025-07-04T23:43:45+5:302025-07-04T23:46:48+5:30
PM Modi Trinidad And Tobago Visit : "बलशाली देशांकडे शूर सैन्यासह या 6 गोष्टी असायला हव्यात"

पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
PM Narendra Modi Honoured With Order Of Republic Of Trinidad And Tobago : त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारने पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' प्रदान करून सन्मानित केले आहे. यासाठी पंतप्रधान मोदींनी तेथील सरकारचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच, १४० कोटी भारतीयांच्या वतीने हा सन्मान मी सामायिक गौरव म्हणून स्वीकारत आहे, असेही मोदी म्हणाले.
'बलशाली देशांकडे शूर सैन्यासह या 6 गोष्टी असायला हव्यात' -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजही भारतीय समुदायाने आपली सामायिक परंपरा, संस्कृती आणि चालीरीती जपल्या आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक सौहार्द पावला-पावलांवर दिसून येते. राष्ट्रपती कंगालू जी यांचे पूर्वज संत तिरुवल्लुवर जी यांची भूमी असलेल्या तामिळनाडूचेच होते. ते म्हणाले होते, बलशाली देशांकडे ६ गोष्टी असायला हव्यात, त्या म्हणजे, शूर सैन्य, देशभक्त नागरिक, संसाधने, चांगले लोकप्रतिनिधी, मजबूत संरक्षण आणि नेहमीच सोबत उभे राहतील, असे मित्र देश."
"आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांचही आणि 'तडका'ही" -
यावेळी दोन्ही देशांच्या संबंधांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "त्रिनिदाद आणि टोबॅगो हा भारतासाठी एक असा मित्र देश आहे, जसे की, आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांचही आहे आणि त्रिनिदाद मिरचीचा 'तडका'ही. भारतासाठी
त्रिनिदाद आणि टोबॅगो हे केवळ कॅरि-कॉमच नव्हे, तर जगातील एक महत्त्वाचे भागीदारही आहेत. आमचे सहकार्य संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी महत्वाचे आहे."
यावेळी, "पहिल्यांदाच एखाद्या परदेशी नेत्याला हा सन्मान प्रदान करणे, आपल्या विशेष संबंधांची खोली दर्शवते," असेही मोदी यांनी म्हटले आहे.