७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:27 IST2025-08-30T17:26:29+5:302025-08-30T17:27:07+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चीनच्या तिआनजिन एअरपोर्टवर पोहचले. तिथे रेड कार्पेटवर मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi reached at tianjin, China for SCO Summit and meeting various world leaders | ७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार

७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी २ दिवसीय जपान दौरा संपवून टोकियोवरून चीनच्या तिआनजिन शहरात पोहचले. याठिकाणी शिखर संमेलनात ते सहभागी होणार आहेत. त्याशिवाय या संमेलनाच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतही मोदी यांची भेट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमधून चीनला पोहचल्याची माहिती दिली. इथल्या एससीओ शिखर संमेलनात विविध देशातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चीनच्या तिआनजिन एअरपोर्टवर पोहचले. तिथे रेड कार्पेटवर मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. चिनी मंत्रिमंडळातील सदस्यांनी मोदींचे स्वागत केले. यावेळी विमानतळावर पारंपारिक नृत्यात त्यांचे स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा अशावेळी होत आहे जेव्हा जगातील बरेच देश ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे त्रस्त आहेत. अलीकडेच अमेरिकेने भारतावर ५० टक्के आणि चीनवर ३० टक्के टॅरिफ लागू केला आहे. चीनमध्ये ३१ ते १ सप्टेंबर या काळात SCO शिखर संमेलन होणार आहे. त्यात २० हून अधिक देशांचे प्रमुख नेते हजर राहतील. 

७ वर्षांनी चीन दौऱ्यावर

२०१५ साली पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी स्वत: जिनपिंग यांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. तेव्हा मोदींनी टेराकोर्ट वॉरियर्सला भेट दिली होती. त्यानंतर २०१६ साली मोदी हांगझोऊ येथील जी २० संमेलनाला हजेरी लावली. त्यावेळी ओबामा, पुतिन यांच्यासोबत भेट झाली होती. २०१७ साली डोकलाम वादानंतर ब्रिक्स समिटमध्ये सहभागी व्हायला ते पुन्हा चीन दौऱ्यावर गेले. त्यावेळी पहिल्यांदाच घोषणा पत्रात पाकिस्तान सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांचा उल्लेख झाला होता. २०१८ साली मोदी आणि जिनपिंग यांच्यात वुहान येथे भेट झाली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये करारांवर सही करण्याऐवजी फक्त चर्चा केली होती. २०१९ साली किंगदाओमध्ये SCO समिट झाले, तेव्हा भारताला पहिल्यांदा पूर्ण सदस्यत्व मिळाले. त्यावेळी भारताने CPEC च्या BRI प्रकल्पाला विरोध केला होता. 

दरम्यान, मागील महिन्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी शी जिनपिंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत भेट घेतली होती. जयशंकर यांच्या दौऱ्यात जल संसाधन डेटा शेअर करणे, व्यापारी निर्बंध, सीमेवरील तणाव कमी करणे, दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. या दौऱ्यातून मोदी यांच्या चीन दौऱ्याचा रोडमॅप तयार केल्याचे बोलले जाते. याआधी मोदी आणि जिनपिंग ऑक्टोबर २०२४ साली रशियाच्या कझानमधील ब्रिक्स संमेलनात भेटले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. 
 

Web Title: PM Narendra Modi reached at tianjin, China for SCO Summit and meeting various world leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.