फिलिपाईन्सच्या दक्षिण भागात एका बेटाजवळ मोठी बोट दुर्घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून २८ जण बेपत्ता आहेत. 'एएफपी' (AFP) या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, बचाव पथकाने किमान ३०१ प्रवाशांना सुखरूप वाचवलं आहे.
कोस्ट गार्ड अधिकार्यांनी माहिती दिली की, ही एक 'इंटर-आयलंड कार्गो आणि पॅसेंजर फेरी' होती, जी झांबोआंगा या बंदर शहरातून सुलू प्रांतातील जोलो बेटाकडे जात होती. यामध्ये ३३२ प्रवासी आणि २७ क्रू मेंबर्स (कर्मचारी) होते. मध्यरात्रीनंतर बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती बुडू लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, प्रवासाला निघाल्यानंतर साधारण ४ तासांनी, स्थानिक वेळेनुसार रविवार आणि सोमवारच्या दरम्यान पहाटे १:५० वाजता जहाजाने संकटाचा सिग्नल पाठवला होता. कोस्ट गार्ड कमांडर रोमेल दुआ यांनी एएफपीला सांगितलं की, बालुक द्वीप गावापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर ही बोट बुडाली. वाचलेल्या प्रवाशांना याच बेटावर नेण्यात आलं आहे. ३१६ लोकांना रेस्क्यू करून बेटावर पोहोचवण्यात आले, त्यापैकी १५ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून २८ जण अजूनही बेपत्ता आहेत.
दुआ यांनी सांगितलं की, बचाव कार्यासाठी कोस्ट गार्डचे एक विमानही पाठवण्यात आले होते. तसेच नौदल आणि वायुसेनेनेही मदतीसाठी आपली पथके रवाना केली आहेत. बसिलनचे गव्हर्नर मुजीब हाटामन यांनी मिंडानाओच्या इसाबेला पोर्टवरील घटनास्थळाचे व्हिडिओ क्लिप्स फेसबुकवर शेअर केले आहेत. यामध्ये वाचवलेल्या लोकांना बोटीतून बाहेर काढले जात असल्याचे दिसत असून, काही प्रवाशांना स्ट्रेचरवरून नेले जात आहे. स्थानिक रेडिओशी बोलताना त्यांनी सांगितले की, वाचलेले बहुतेक लोक सुरक्षित आहेत, परंतु अनेक वृद्ध प्रवाशांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज आहे.
बोट नेमकी का बुडाली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे दुआ यांनी स्पष्ट केलं. बंदरातून निघण्यापूर्वी कोस्ट गार्डने या बोटीला परवानगी दिली होती आणि ओव्हरलोडिंगचे कोणतेही संकेत नव्हते, असंही त्यांनी सांगितलं. फिलीपिन्समध्ये सागरी दुर्घटना ही एक सामान्य बाब आहे. या द्वीपसमूहात वारंवार चक्रीवादळे येतात. याशिवाय जहाजांची योग्य निगा न राखणे, गर्दी आणि सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी न होणे ही देखील दुर्घटनेची प्रमुख कारणं ठरतात.
Web Summary : A boat carrying over 350 passengers sank in the Philippines, leaving 15 dead and 28 missing. Coast Guard rescued 301. The ferry, en route to Jolo Island, experienced a technical malfunction. Investigation underway to determine the cause of the accident.
Web Summary : फिलीपींस में 350 से अधिक यात्रियों वाली एक नाव डूब गई, जिसमें 15 की मौत हो गई और 28 लापता हैं। कोस्ट गार्ड ने 301 को बचाया। जोलो द्वीप जा रही फेरी में तकनीकी खराबी आई। दुर्घटना के कारण का पता लगाने के लिए जांच जारी है।