पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:00 IST2025-11-24T10:58:21+5:302025-11-24T11:00:50+5:30
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला झाला आहे.

पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
Pakistan Peshawar Attack: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी पेशावर येथे सोमवारी सकाळी फेडरल कॉन्स्टेबुलरी या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला झाला. तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सकाळच्या ८ वाजून १० मिनिटांनी सदर परिसरातील मुख्यालयावर हा हल्ला झाला. मुख्यालयात दोन आत्मघाती बॉम्बस्फोट झाले. एक स्फोट मुख्य प्रवेशद्वाराजवळ, तर दुसरा स्फोट मोटारसायकल स्टँडवर झाला. स्फोटांनंतर दहशतवाद्यांनी मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि परिसरामध्ये तुफान गोळीबार सुरू झाला.
सुरक्षा दलांची तातडीने कारवाई
गोळीबाराचा आवाज येताच पोलीस आणि सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसराची नाकेबंदी केली. सुरक्षा दलांनी त्वरित केलेल्या कारवाईमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. रॉयटर्स आणि डॉनच्या अहवालानुसार, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर वेढला आहे आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत आहेत.
हे मुख्यालय एका लष्करी छावणीजवळ आणि गर्दीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे सुनहरी मशिद रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
दहशतवादी घटनांमध्ये वाढ
पाकिस्तानमध्ये, विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात, गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने पाक सरकारसोबत केलेला युद्धबंदी करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून त्यांनी पोलीस, सुरक्षा दल आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याची शपथ घेतली आहे. आजचा पेशावरमधील हल्ला याच वाढत्या दहशतवादी कारवायांमधील एक भाग आहे. सप्टेंबर महिन्यातही खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू जिल्ह्यात एफसी मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला होता, ज्यात सहा सैनिक शहीद झाले होते.