इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:01 IST2026-01-01T19:01:31+5:302026-01-01T19:01:52+5:30
तेहरान, शिराज, इस्फहान, करमानशाह आणि फासासह अनेक शहरात हिंसक आंदोलन झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी हुकुमशाह मुर्दाबाद, खामेनेई मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत.

इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विरोधी निदर्शने पाहायला मिळत आहेत. हे आंदोलन सरकारच्या एका निर्णयाविरोधात आहे. ज्याला लोकांनी प्रचंड विरोध केला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी काम ठप्प झालं आहे.
AFP न्यूज एजन्सीनुसार, या आंदोलनात अनेक ठिकाणी आंदोलक आणि इराणच्या सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटी झाल्या. त्यात सुरक्षा दलाचे सदस्य मारले गेलेत. परिस्थिती पाहता अधिकाऱ्यांनी अचानक सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. त्यामुळे ३१ मधील २१ प्रांतात व्यवसाय, यूनिवर्सिटी, सरकारी कार्यालये बंद झाली आहेत. इराणमधील विरोधी आंदोलनामागे आर्थिक आणि राजकीय कारण असल्याचे बोलले जाते. सोशल मीडियात याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. ज्यात तेहरान, शिराज, इस्फहान, करमानशाह आणि फासासह अनेक शहरात हिंसक आंदोलन झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी हुकुमशाह मुर्दाबाद, खामेनेई मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत.
🚨 Across Iran: Crowds have poured into the streets in major cities, channeling fury over economic collapse into bold calls against the Islamic Republic's rule—an unyielding push for change. #IranProtestspic.twitter.com/XdxHeGR9Kx
— Am Yisrael Chai 🇮🇱🎗 (@kyg_best) December 31, 2025
केव्हा सुरू झालं आंदोलन?
रविवारी तेहरानच्या बाजारपेठेत ही निदर्शने सुरू झाली. इराणी चलन रियालमध्ये मोठी घसरण झाल्याने किमती वाढल्या. दुकानदारांनी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निषेध केला ज्याचा थेट परिणाम उपजीविकेवर झाला. चलन घसरणीमुळे आयात किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. जी ५०% पेक्षा जास्त झाली आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्येही या आंदोलनाचे पडसाद दिसले. आंदोलकांनी बेरोजगारी, पाणीटंचाई आणि प्रशासकीय समस्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
२०२२ नंतर व्यापक निदर्शने
२०२२ नंतर पुन्हा एकदा व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत. त्यावेळी महसा अमिनीच्या पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर निदर्शने सुरू झाली. अमिनी ही एक तरुण महिला नेता होती जिच्यावर इराणच्या पोलिसांनी हिजाब योग्यरित्या न घातल्याचा आरोप केला होता. सध्या सुरू असलेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी संघर्ष झाला सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झटापट झाली. फार्स प्रांतातील फासा शहरात एका जमावाने राज्यपाल कार्यालय असलेल्या सरकारी संकुलाचे गेट तोडल्याचे दिसून आले. या घटनेप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत तीन पोलीस जखमी झाले आहेत.
दरम्यान, इराणमधील खराब आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आर्थिक जोखीमही उचलण्याची तयारी दर्शवली आहे. लवकरच आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ असं राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा प्रॉसिक्यूटर जनरल मोहम्मद मोवाहेदी आजाद यांनी आंदोलनकर्त्यांना दिला आहे.