Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 06:52 IST2025-12-01T06:50:10+5:302025-12-01T06:52:02+5:30
Philippines Protest 2025: पूर प्रकल्पात कोट्यवधीचा घोटाळा : लोकांमध्ये संताप, भ्रष्टाचाऱ्यांवर खटला चालवण्याची संतप्त निदर्शकांची मागणी

Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
मनिला : फिलिपिन्समध्ये भ्रष्टाचाराविरोधीआंदोलनाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये अब्जावधी रुपयांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या नेते व अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ खटला चालवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
हे आंदोलन देशभर पसरले असून रोमन कॅथोलिक चर्चच्या पाद्रींसह हजारो लोकांनी रविवारी रस्त्यांवर उतरत सरकारविरोधात निदर्शने केली. दोन महिन्यांपूर्वी याच मुद्दयाला धरून फिलिपिन्समध्ये झालेल्या आंदोलनावेळी हिंसाचार उसळला होता.
पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे देशातील नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहे.
राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्या सरकारने एकतर निकृष्ट दर्जाचे काम केले आहे किंवा अस्तित्वात नसलेल्या पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप या आंदोलकांकडून होत आहे. त्या रागातून आंदोलकांनी या नेत्याचे पुतळे जाळले.
डाव्या पक्षांनीही वेगळे आंदोलन करत केला निषेध
देशभर भ्रष्टाचाराविरोधात लोक रस्त्यावर उतरलेले असताना येथील डाव्या विचारांच्या पक्षांनी मनिलाच्या मुख्य उद्यानात एकत्र येत सरकारचा निषेध केला. भ्रष्टाचारात सहभागी असणारे संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ राजीनामा देऊन खटल्याला सामोरे जाण्याची मागणी डाव्या पक्षांनी केली आहे.
अधिकाऱ्याकडून भ्रष्टाचाराची कबुली
पूर नियंत्रण प्रकल्पांच्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या माजी सरकारी अभियंता हेन्री अल्कांतारा याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
एवढेच नाही तर भ्रष्टाचारातून 3 मिळवलले १९ कोटी डॉलर परत करण्याचे आश्वासन त्याने दिले आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी आतापर्यंत २०६ कोटी डॉलर गोठवण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनियर यांनी स्पष्ट केले.
१७ हजार पोलिस तैनात
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी मनिला शहरात खबरदारी म्हणून १७हजार पोलिस तैनात करण्यात आले होते तर राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला होता. मनिला शहरात विविध भागांत लोकांनी आंदोलन केले. या शहरातील ईडीएसए महामार्गावरील पीपल पॉवर स्मारकासमोर झालेल्या आंदोलनात ५ हजार लोक सहभागी झाले होते.