हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 20:13 IST2025-11-26T20:13:44+5:302025-11-26T20:13:55+5:30
Hong Kong Fire: अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, एकाचवेळी सर्व टॉवरना आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, त्याची चौकशी सुरू आहे.

हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
हाँगकाँगच्या एका मोठ्या निवासी संकुलातील उंच अपार्टमेंट इमारतींना लागलेल्या भीषण आगीत १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर किमान १५ हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, एकाचवेळी सर्व टॉवरना आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, त्याची चौकशी सुरू आहे.
ही आग बुधवार दुपारच्या सुमारास लागली आणि रात्रीपर्यंत आग मोठ्या प्रमाणात धुमसत होती. अधिकाऱ्यांनी आगीची तीव्रता लेव्हल ५ (सर्वोच्च) पर्यंत वाढवली होती. या दुर्घटनेत नऊ जणांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले, तर चार जणांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. मृतांमध्ये एका अग्निशमन कर्मचाऱ्याचाही समावेश आहे, तर दुसरा अग्निशमन कर्मचारी 'हिट एग्जॉशन'मुळे जखमी झाला आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच १२८ फायर ट्रक आणि ५७ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने तत्परता दाखवत जवळपास ७०० लोकांना सुरक्षित बाहेर काढून तात्पुरत्या निवारागृहात हलवले. हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर बांबूचे मचान आणि बांधकाम जाळ्या लावण्यात आल्या होत्या. आगीच्या ज्वाळा आणि घनदाट धूर या मचान आणि जाळ्यांवर वेगाने पसरला, ज्यामुळे आग इतर इमारतींमध्ये पसरली.
या निवासी संकुलात सुमारे आठ ब्लॉक्स होते, ज्यात जवळपास २,००० अपार्टमेंट्समध्ये ४,८०० लोक राहत होते. या मोठ्या दुर्घटनेमुळे हाँगकाँगमध्ये शोककळा पसरली आहे.