पाकिस्तानचा 'डेंजरस' प्लॅन! भारताने ज्या विमानाला धूळ चारली, तेच आता 'या' देशाला विकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:15 IST2026-01-13T12:14:25+5:302026-01-13T12:15:26+5:30
अझरबैजान आणि सौदी अरेबियानंतर आता पाकिस्तान आपला वादग्रस्त 'JF-17' फायटर जेट विमान एका मोठ्या मुस्लिम देशाला विकण्याच्या तयारीत आहे.

पाकिस्तानचा 'डेंजरस' प्लॅन! भारताने ज्या विमानाला धूळ चारली, तेच आता 'या' देशाला विकणार?
आर्थिक संकटाचा सामना करणारा पाकिस्तान आता आपली तिजोरी भरण्यासाठी शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर भर देत आहे. अझरबैजान आणि सौदी अरेबियानंतर आता पाकिस्तान आपला वादग्रस्त 'JF-17' फायटर जेट विमान एका मोठ्या मुस्लिम देशाला म्हणजेच इंडोनेशियाला विकण्याच्या तयारीत आहे. सुमारे ४० विमानांसह 'शाहपर किलर ड्रोन'साठी दोन्ही देशांमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या संरक्षण करारावर चर्चा सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्र्यांची भेट आणि मोठा दावा
सोमवारी इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री शाफ्री श्यामसुद्दीन यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या हवाई दल प्रमुखांची भेट घेतली. या बैठकीत केवळ विमानांची विक्रीच नाही, तर किलर ड्रोन आणि संरक्षण प्रशिक्षण यावरही सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडोनेशिया ४० पेक्षा अधिक 'JF-17' विमानांमध्ये रस दाखवत आहे. पाकिस्तान आणि चीनने मिळून विकसित केलेले हे 'मल्टी-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट' सध्या पाकिस्तानच्या मार्केटिंगचा मुख्य भाग बनले आहे.
भारतासमोर पडले होते फिके!
ज्या 'JF-17' विमानाची पाकिस्तान जगभरात जाहिरात करत आहे, त्याचा खरा चेहरा भारताने जगासमोर आधीच उघड केला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय हवाई दलाने या विमानांच्या मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. भारताच्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेसमोर 'JF-17' आणि 'F-16' सारखी विमाने टिकू शकली नव्हती. भारतीय वैमानिकांनी ही विमाने पाडली होती, ज्यामुळे जागतिक बाजारात या विमानांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
पाकिस्तानचा कस्टमर बेस वाढतोय?
पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत म्यानमार, नायजेरिया आणि लिबिया यांसारख्या देशांना आपली विमाने विकली आहेत. २०१८ ते २०२१ दरम्यान पाकने म्यानमारला ११ विमाने पुरवली. लिबियासोबत ४ अब्ज डॉलर्सचा मोठा शस्त्रास्त्र करार केला. सौदी अरेबियासोबत २ अब्ज डॉलर्सचे कर्ज विमानांच्या बदल्यात फेडण्यासाठी चर्चा सुरू आहे. तर, अझरबैजानने नुकताच 'JF-17C' ब्लॉक III विमानांचा सौदा पूर्ण केला आहे.
इंडोनेशियाची रणनीती काय?
इंडोनेशिया सध्या आपल्या हवाई दलाचे आधुनिकीकरण करत आहे. त्यांनी फ्रान्सकडून ४२ 'राफेल' विमाने आणि तुर्कीकडून ४८ 'KAAN' फायटर जेट्सची ऑर्डर दिली आहे. अमेरिकेच्या F-15EX साठीही त्यांची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत स्वस्त पर्याय म्हणून ते पाकिस्तानच्या JF-17 कडे वळण्याची शक्यता आहे. मात्र, तांत्रिक बिघाड आणि देखभालीच्या समस्यांमुळे चर्चेत राहिलेले हे विमान इंडोनेशियाच्या ताफ्यात कितपत यशस्वी ठरेल, याबाबत तज्ज्ञांमध्ये शंका आहे.