इस्लामाबाद: भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबातील १४ सदस्य मारले गेले. या सर्वांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे १४ कोटी रुपये देण्याची तयारी पाकिस्तान सरकारने केली आहे. यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा केली.
पाकचा कांगावा, आमचे ११ सैनिक, ४० नागरिक ठार
गेल्या आठवड्यात भारताशी झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे ११ सैनिक मारले गेले आणि ७८ जखमी झाल्याचा कांगावा पाकिस्तानने मंगळवारी केला. ६-७ मेच्या मध्यरात्री भारताने केलेल्या हल्ल्यात ४० नागरिकांचा मृत्यू झाला व १२१ लोक जखमी झाल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.
हेरगिरी करणाऱ्या पाक अधिकाऱ्यास हाकलले
नवी दिल्ली: पाक उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याची हेरगिरीचा ठपका ठेवत भारताने मंगळवारी हकालपट्टी केली. राजनयिकाचे जे कार्य आहे, त्या कक्षेच्या बाहेर जाऊन या अधिकाऱ्याने संशयास्पद कारवाया केल्याचे निदर्शनास आल्याने त्याला २४ तासांच्या आत निघून जाण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले.