पाकिस्तानमध्ये पोलीस मुख्यालय, चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, किमान ५ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 08:18 PM2023-12-15T20:18:17+5:302023-12-15T20:19:18+5:30

अंसारुल जिहाद या नव्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली पोलीस लाईन्सवरील हल्ल्याची जबाबदारी

Pakistan terrorist attack on police headquarters minimum 5 killed Ansarul Jihad terrorist group takes responsibility | पाकिस्तानमध्ये पोलीस मुख्यालय, चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, किमान ५ जण ठार

पाकिस्तानमध्ये पोलीस मुख्यालय, चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, किमान ५ जण ठार

terrorist attack on police headquarters, Pakistan: पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या प्रादेशिक पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात किमान तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वीही याच भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात २३ पाकिस्तानी सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला होता. ज्या पोलीस लाइनमध्ये हा हल्ला झाला तो परिसर खैबर पख्तूनख्वामधील टँक जिल्ह्यात आहे. यासोबतच एका चेकपोस्टवर दहशतवादी हल्ला झाल्याचीही माहिती आहे, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच या हल्ल्यात कमीत कमी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने टँक जिल्हा पोलीस अधिकारी इफ्तिखार शाह यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, एका दहशतवाद्याने आत्मघातकी बॉम्बने स्वत:ला उडवले तेव्हा हा हल्ला झाला. हा हल्ला मोठा असू शकला असता, असे या अधिकाऱ्याने सांगितले. स्फोटानंतर लगेचच संपूर्ण परिसरात आणखी दहशतवाद्यांची हालाचाल किंवा वास्तव्य आहे का, याबद्दल तपास सुरू असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पोलीस लाईनमध्ये उपस्थित असलेल्या सर्व जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अंसारुल जिहाद या नव्या दहशतवादी संघटनेने पोलीस लाईन्सवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सध्या पोलीस संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वीही झाला होता मोठा दहशतवादी हल्ला

तीन दिवसांपूर्वी मंगळवारी उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २३ सुरक्षा जवान मृत्यूमुखी पडले असून ३० हून अधिक जण जखमी झाले. तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने (TJP) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तहरीक-ए-जिहाद ही एक नवीन दहशतवादी संघटना आहे, जी पाकिस्तानमधील प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंधित आहे.

४ नोव्हेंबरला एअरबेसवर हल्ला

४ नोव्हेंबर रोजी TJP दहशतवाद्यांनी लाहोरपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानी हवाई दलाच्या मियांवली ट्रेनिंग एअर बेसवरही हल्ला केला होता. या हल्ल्यात तळावर तैनात असलेल्या तीन लढाऊ विमानांचे नुकसान झाले. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. बहुतेक हल्ले पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य करत आहेत.

Web Title: Pakistan terrorist attack on police headquarters minimum 5 killed Ansarul Jihad terrorist group takes responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.