शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानचे समर्थन; जो बायडन यांना दखल घेण्याची करणार विनंती
By देवेश फडके | Updated: January 29, 2021 14:37 IST2021-01-29T14:34:00+5:302021-01-29T14:37:20+5:30
भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची पाकिस्तानातही मोठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या पाकिस्तानच्या संसदीय समितीच्या बैठकीत भारताकडून हा मुद्दा चर्चिला गेला.

शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानचे समर्थन; जो बायडन यांना दखल घेण्याची करणार विनंती
इस्लामाबाद :भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचीपाकिस्तानातही मोठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शवत पाकिस्तान आता भारतविरोधी आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
भारताच्या प्रजासत्ताक दिनीच्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनाचे पाकिस्तानच्या संसदीय समितीने कौतुक केले आहे आणि संघर्ष करणाऱ्या शीख शेतकऱ्यांच्या एकजुटीचे समर्थन केले आहे. गुरुवारी झालेल्या पाकिस्तानच्या संसदीय समितीच्या बैठकीत भारताकडून झालेल्या मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.
इम्रान खान यांच्या 'नव्या पाकिस्ताना'त भ्रष्टाचार वाढला; पाहा भारत कोणत्या स्थानावर
परराष्ट्र व्यवहाराच्या संसदीय समितीची ही बैठक मुशैद हुसैन सैय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अतिवादाचा खरा चेहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणावा, हे पाकिस्तान सरकारने सुनिश्चित करावे, अशी सूचना संसदीय समितीकडून करण्यात आली असल्याचे मुशैद हुसैन सैय्यद यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या अत्याचारांना विरोध करणाऱ्यांसाठी २६ जानेवारी हा काळा दिवस होता. नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर शीख शेतकऱ्यांनी आपला पवित्र ध्वज फडकवला. ही समिती शेतकऱ्यांसोबत आहे, असेही ते पुढे म्हणाले. शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रति आम्ही संवेदना प्रकट करतो. भारतात सन २०१९ मध्ये १० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुस्लिम बांधवांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केले गेले. त्यामुळे मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा पाकिस्तान सरकारने मानवाधिकार परिषद, युरोपीय संसद, युरोपीय युनियन आणि जो बायडन यांच्या समक्ष मांडावा, असेही ते म्हणाले.