पाकने तालिबानच्या राजदूताला बोलावले अन् चांगलेच सुनावले; ११ सैनिक मारले गेल्यावर दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:33 IST2026-02-19T18:33:30+5:302026-02-19T18:33:53+5:30
Pakistan And Afghanistan News: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ताणाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पाकने तालिबानच्या राजदूताला बोलावले अन् चांगलेच सुनावले; ११ सैनिक मारले गेल्यावर दिला इशारा
Pakistan And Afghanistan News: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ताणाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका हल्ल्यात ११ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. यावरून आता पाकिस्तानने अफगाणिस्तानला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या हल्ल्यासाठी अफगाणिस्तानचा भूभाग वापरण्यात आला होता.
खैबर पख्तूनख्वामधील बाजौर भागात हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर धडकवले, ज्यामध्ये ११ पाकिस्तानी सैनिक आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानला इशारा देत म्हटले आहे की, आमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हल्लेखोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ते कुठेही असले तरी प्रत्युत्तर देण्याचा आणि त्यांचा बंदोबस्त करण्याचा अधिकार पाकिस्तानला आहे. तसेच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या राजदूतांना बोलावून कठोर शब्दांत समज दिली आहे.
कोणतीही स्पष्ट किंवा ठोस कारवाई झालेली नाही
पाकिस्तानने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजौरमधील पाकिस्तानी सैन्य आणि कायदा अंमलबजावणी चौक्यांवर झालेल्या आत्मघातकी वाहन हल्ल्याचा पाकिस्तान तीव्र निषेध करतो, जो टीटीपीने केला होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली की, टीटीपीचे संपूर्ण नेतृत्व अफगाणिस्तानात आहे, ते त्या भूमीवरून मुक्तपणे कारवाया करत आहेत. पाकिस्तानला अफगाण तालिबान सरकारकडून वारंवार आश्वासने मिळाली आहेत परंतु दुर्दैवाने, कोणतीही स्पष्ट किंवा ठोस कारवाई झालेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अफगाण तालिबान सरकारला त्यांच्या हद्दीतून कारवाया करत असलेल्या सर्व दहशतवादी गटांवर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानला त्यांच्या सैन्याची, नागरिकांची आणि प्रदेशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कुठेही आणि कोणतीही कारवाई करण्याच अधिकार आहे.