"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 23:14 IST2025-09-26T23:00:16+5:302025-09-26T23:14:34+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांंनी डोनाल्ड ट्रम्प यांना शांतीदूत म्हणत त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.

"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
Shehbaz Sharif on India Pakistan Ceasefire:पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी थेट नोबेल शांतता पुरस्काराची मागणी करून मोठा राजकीय ड्रामा केला आहे. शरीफ यांनी आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांच्या भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती केली. शरीफ यांनी यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेचे चाहते असा उल्लेख केला.
"शक्तीशाली स्थितीत असूनही, पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शविली, ज्यामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्या धाडसी आणि प्रभावी नेतृत्वाने मध्यस्थी केली होती. जर त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर ते युद्ध झाले असते. जगाच्या या भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि म्हणूनच पाकिस्तानने त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे," असं शहबाज शरीफ म्हणाले.
"काय घडले हे सांगण्यासाठी कोणी वाचले असते? आणि म्हणूनच, जगाच्या आपल्या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांच्या अद्भुत आणि उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन, पाकिस्तानने त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले. मला वाटते खरोखर, ते शांततेचे चाहते आहेत," असंही शहबाज शरीफ यांनी म्हटलं.
यावेळी भाषणादरम्यान, शहबाज शरीफ यांनी काश्मीर, पाणी करार आणि दहशतवादाच्या मुद्द्यांवर पाकिस्तानला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला. माध्यमांच्या वृत्तानुसार, शरीफ यांनी आपल्या भाषणात भारतावर अनेक गंभीर आरोप करत आंतरराष्ट्रीय समुदायाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान भारताशी वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे, असेही शहबाज शरीफ म्हणाले.
शरीफ यांनी पहलगाम दहशतवादी घटनेचे राजकारण केल्याचा आरोप केला. इस्लामाबादने भारताला दिलेली स्वतंत्र चौकशी करण्याची ऑफर नाकारल्याचे शरीफ म्हणाले. कोणताही पुरावा सादर न करता पाकिस्तानी शहरांवर आणि नागरिकांवर भारताने हल्ले केल्याचा आरोप शरीफ यांनी केला. शरीफ यांनी भाषणात फील्ड मार्शल असीम मुनीर आणि एअर चीफ मार्शल झहीर बाबर सिद्धू यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या सैन्याने दाखवलेल्या कथित शौर्याबद्दल कौतुक केले.
"भारतासोबतच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानला राजनैतिक पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही चीन, सौदी अरेबिया, तुर्की आणि अझरबैजानचे आभार मानतो," असेही शहबाज शरीफ यांनी म्हटलं.
भारताने फेटाळलाय हस्तक्षेप
दरम्यान, शरीफ यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण भारताने यापूर्वीच ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा फेटाळला आहे. मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी मदत केल्याचे ते सतत सांगत आले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लष्करी कारवाईत कोणत्याही परदेशी हस्तक्षेपाचा इन्कार केला आहे.