पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:27 IST2025-10-24T11:26:39+5:302025-10-24T11:27:15+5:30
Pakistan bans TLP: हिंसक आंदोलनात अनेक पोलिसांसह १६ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचे गांभीर्य लक्षात घेत, हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
Pakistan bans TLP: पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारला परकीय आक्रमणासोबतच देशांतर्गत घडामोडींमुळेही डोकेदुखी होताना दिसत आहे. अलिकडच्या काळात तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) हे संघटना त्यांच्या सरकारसाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे शरीफ सरकारने TLP विरुद्ध कठोर कारवाई केली असून, त्या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आहे. १९९७च्या दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत (ATA) टीएलपीवर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. अलिकडच्या काळात झालेल्या हिंसक आंदोलनात अनेक पोलिसांसह १६ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचे गांभीर्य लक्षात घेत, हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बंदीचा निर्णय एकमताने मंजूर
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहशतवाद आणि हिंसाचार या दोन मुद्द्यावर टीएलपीवर बंदी घालण्याच्या पंजाब प्रांताच्या सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाने एकमताने या बंदीला मान्यता दिली आहे. पंजाब सरकारने यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टीएलपीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकन दूतावासाबाहेर निषेध करण्याच्या उद्देशाने टीएलपीने गाझा सॉलिडॅरिटी मार्चच्या नावाखाली इस्लामाबादकडे मार्च सुरू केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
२०२१ मध्येही घालण्यात आली होती बंदी
पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) मते, TLP ने आतापर्यंत पाकिस्तानात हिंसाचार आणि अशांतता भडकवण्याचाच प्रयत्न केला आहे. २०२१ मध्ये पहिल्यांदा त्यावर बंदी घालण्यात आली होती, परंतु सहा महिन्यांनंतर हिंसाचार टाळावा या अटीवर बंदी उठवण्यात आली होती. आता त्यांनी या अटीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर बंदी घालताना हे कारण देण्यात आले आहे. बंदीनंतर TLP ला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी प्राधिकरण (NACTA) च्या बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीत समाविष्ट केले जाईल, ज्यामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TPP), बलुच लिबरेशन आर्मी (BLA), लष्कर-ए-तैयबा (LAT), लष्कर-ए-झांगवी आणि जैश-ए-मोहम्मद (JEM) सारख्या दहशतवादी गटांचा समावेश आहे.