Ramayana in Pakistan: भारतासह विविध देशांमध्ये रामायणाचे सादरीकरण केले जाते. त्या-त्या देशातील स्थानिक कलाकार यात भाग घेतात. विशेष म्हणजे, आता चक्क पाकिस्तानात मुस्लिम कलाकारांनी रामायणाचे सादरीकरण केले आहे. यासाठी त्या नाट्यसमूहाचे खूप कौतुक केले जात आहे. कराची कला परिषदेत 'मौज' नावाच्या ग्रुपने एआय वापरुन हे नाटक सादर केले.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला जातो. अशातच चक्क रामायण नाटकाचे सादरीकरण केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या रामलीलेचे दिग्दर्शक योहेश्वर करेरा म्हणाले, माझ्यासाठी रामायण रंगमंचावर जिवंत करणे हा एक अद्भुत दृश्य अनुभव आहे. आमच्या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला.'
'अनेक समीक्षकांनी निर्मितीचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मला कधीच वाटले नाही की, लोक मला नापसंत करतील किंवा रामायण सादर केल्यामुळे मला काही अडचणींचा सामना करावा लागेल. यातून दिसून येते की, पाकिस्तानी समाज जितका समजला जातो, त्यापेक्षा जास्त सहिष्णु आहे.'
दरम्यान, पाकिस्तानातील कला आणि चित्रपट समीक्षक ओमैर अल्वी म्हणाले की, रामायण ही अशी कथा आहे, जी जगभरातील लाखो लोकांना जोडते. ते कथाकथनातील प्रामाणिकपणाने प्रभावित झाले. रामायणाच्या सादरीकरणादरम्यान प्रकाशयोजना, संगीत, कलाकारांचे रंगीत पोशाखाने नाटकाची भव्यता वाढली, असेही म्हणाले.