पाकिस्तानचा खोटा दिखावू 'माज'; भारताची 'ही' ऑफर धुडकावली...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:59 IST2021-11-02T20:58:40+5:302021-11-02T20:59:46+5:30
इस्लामाबाद - भारताने अफगाणिस्तान मुद्द्यावर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा ...

पाकिस्तानचा खोटा दिखावू 'माज'; भारताची 'ही' ऑफर धुडकावली...!
इस्लामाबाद - भारतानेअफगाणिस्तान मुद्द्यावर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (Pakistan NSA) डॉ मोईद युसूफ यांनी म्हटले आहे. भारताने 10 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे अफगाणिस्तान मुद्द्यावर एका परिषदेचे आयोजन केले आहे. मोईद युसूफ यांना एका पत्रकार परिषदेदरम्यान यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी भारतावर निशाणा साधत, कुणी 'बिघडवणारे' ‘शांतिदूत' होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
भारताचे आमंत्रण धुडकावले -
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आयोजित या परिषदेत रशिया, चीन, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान सहभागी होणार आहेत. पाकिस्तानने सप्टेंबर महिन्यात आणि इराणने ऑक्टोबर महिन्यात एका अशाच परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, त्यासाठी भारताला निमंत्रण देण्यात आले नव्हते. पण भारताने आपल्या प्रादेशिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मोईद यांनाही आमंत्रित केले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे.
यापूर्वी, एका न्यूज ब्रिफिंगमध्ये, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ता असीम इफ्तिखार यांनी म्हटले होते, की भारत नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी परिषदेच्या माध्यमाने अफगाणिस्तानमध्ये आपली प्रासंगिकता शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
मोईद म्हणाले, अफगाणिस्तानबाबत पाकिस्तान आणि उझबेकिस्तानची भूमी सारखीच आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील मानवी संकट टाळण्यासाठी तालिबान राजवटीसोबत रचनात्मक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. मात्र, जग काबूलशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरले, तर परिणाम स्वरूप गंभीर मानवी संकट निर्माण होऊ शकते.