भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 18:19 IST2025-05-07T18:12:21+5:302025-05-07T18:19:52+5:30
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एनएससीने एक बैठक घेतली.

भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
भारताने आज पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. लष्कराने रात्री १.३० वाजता पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता या हल्ल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सकाळपासूनच बैठका घेतल्या आहेत.
आज बुधवारी पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC) बैठक झाली, यामध्ये कॅबिनेट मंत्री, सर्व प्रांतांचे मुख्यमंत्री, सर्व लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानचा तिळपापड
भारतीय हवाई हल्ल्यांच्या काही तासांनंतर, एनएससीने ते "अकारण, भ्याड आणि बेकायदेशीर युद्ध" असे वर्णन केले. सरकारी निवेदनानुसार, एनएससीने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांना सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन म्हटले आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ते युद्धाचे कृत्य असल्याचे म्हटले.
एनएससीने म्हटले की, हे हल्ले नागरी भागात केले.तिथे काल्पनिक दहशतवादी छावण्या" च्या बहाण्याने निष्पाप पुरुष, महिला आणि मुलांची हत्या केली. या हल्ल्यांमुळे नागरी पायाभूत सुविधा, मशिदी आणि इतर इमारतींचेही नुकसान झाले.
भारताच्या हल्ल्यांमुळे आखाती देशांना जाणाऱ्या व्यावसायिक उड्डाणांना धोका निर्माण झाला आहे, यामुळे हजारो प्रवाशांचे जीवन धोक्यात आले आहे, असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. एनएससीने म्हटले आहे की, भारताने "अविचारीपणे आणि बेजबाबदारपणे" या प्रदेशात तणाव वाढवला आहे आणि त्याच्या परिणामांसाठी भारत जबाबदार असेल.
पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
'भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यात २६ जण ठार झाले आहेत आणि ४६ हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तान सैन्याने दिली. भारताने हा हल्ला पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. सरकारी निवेदनानुसार, बुधवारसाठी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पंजाब पोलिसांसह सर्व सुरक्षा एजन्सींना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय युनिट्सना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.