अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी भारत आयोजित करणार NSA स्तरीय बैठक, पाकचा सहभागी होण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:28 IST2021-11-02T17:28:03+5:302021-11-02T17:28:22+5:30
India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे.

अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी भारत आयोजित करणार NSA स्तरीय बैठक, पाकचा सहभागी होण्यास नकार
India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे. या बैठकीसाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. पण त्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. उझबेकिस्तानसोबतच्या एका सुरक्षा करारावर स्वाक्षरी करताना पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याची माहिती दिली आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानच्या बिझनेस रेकॉर्ड या वृत्तपत्रात देखील छापून आलं आहे.
भारतानं आयोजित केलेल्या बैठकीचं निमंत्रण पाकिस्ताननं स्वीकारलं आहे का? याबाबत युसूफ यांना विचारण्यात आलं असता त्यांनी 'मी जाणार नाही' असं उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याआधीच भारतानं आयोजित केलेल्या बैठकीसाठी निमंत्रण आल्याची माहिती दिली होती. भारताकडून अधिकृतरित्या रशिया, इराण, चीन, पाकिस्तान, तझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात ही उच्चस्तरिय बैठक होणार आहे.
मॉक्सोत देखील झाली होती बैठक
रशियानं याआधी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मॉक्सोत बैठकीचं आयोजन केलं होतं. यात भारत देखील सहभागी झाला होता. यात तालिबानच्या उच्चस्तरिय प्रतिनिधी मंडळानं अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारचे उप प्रधानमंत्री अब्दुल सलाम हनफी यांच्या नेतृत्त्वात उपस्थिती लावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली होती.
भारतानं बैठकीत काय म्हटलं?
मॉक्सोमध्ये झालेल्या बैठकीत भारतानं अफगाणिस्तानला व्यापक पद्धतीनं मानवीय सहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी भारत ठामपणे उभा आहे, असंही म्हणण्यात आलं होतं. तालिबाननं ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानातील सरकार कोसळलं. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक भागात भूकबळीची स्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या भूकबळीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. ज्यामुळे आगामी काळात देशात खूप मोठं मानवीय संकट कोसळू शकतं.