जेडी वेन्स तेहरानला जाणार? इराण युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानची धडपड; काय आहे छुपा अजेंडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:23 IST2026-03-24T13:23:40+5:302026-03-24T13:23:40+5:30
Pakistan Mediates US Iran War: इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तानची मध्यस्थी. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचा शांतीचा प्रस्ताव. आर्थिक संकटातून सुटण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल? वाचा सविस्तर बातमी.

जेडी वेन्स तेहरानला जाणार? इराण युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानची धडपड; काय आहे छुपा अजेंडा?
मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी आता पाकिस्तानने पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आसुसले असून तसे प्रयत्न करत आहेत. आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान या निमित्ताने जागतिक स्तरावर आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानची रणनीती आणि छुपा हेतू:
१. द्विस्तरीय प्रयत्न: एकीकडे शहबाज शरीफ राजनैतिक पातळीवर मुस्लिम देशांशी संपर्क साधत आहेत, तर दुसरीकडे जनरल असीम मुनीर अमेरिकन लष्करी नेतृत्वाशी चर्चा करत आहेत.
२. आर्थिक मदतीची अपेक्षा: जर पाकिस्तानने ही मध्यस्थी यशस्वी केली, तर अमेरिकेकडून त्यांना आर्थिक पॅकेज किंवा कर्जात सवलत मिळण्याची शक्यता आहे.
३. सौदी अरबचा पाठिंबा: पाकिस्तान या प्रक्रियेत सौदी अरबलाही सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून इराणवर दबाव निर्माण करता येईल.
मध्यस्थीसमोर मोठी आव्हाने
पाकिस्तान स्वतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने इराण किंवा अमेरिका त्यांचे कितपत ऐकतील, याबाबत तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच, पाकिस्तानचे इराणशी असलेले संबंध अनेकदा चढ-उताराचे राहिले आहेत, विशेषतः सीमावादावरून झालेल्या अलीकडील हल्ल्यांनंतर इराण पाकिस्तानवर किती विश्वास ठेवेल, हा मोठा प्रश्न आहे.
इराण सावध...
जागतिक तज्ञांनुसार अमेरिका इराणच्या रिफायनरी, कच्च्या तेलाच्या प्लांटसह अणूउर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी इराणला यु्द्ध थांबविण्याच्या चर्चेत गुंतवून ठेवून अचानक हल्ला करण्याची देखील शक्यता आहे. इराण देखील सावध असून अमेरिकेच्या युद्धबंदीच्या प्रस्तावावर अंतर्गत चर्चा करण्यासाठी वेळ मागत आहे, असे वृत्त सीएननने दिले आहे. यानुसार इराण युद्ध थांबविण्याला अमेरिकेने मान्यता दिली आहे, तसा प्रस्तावही इराणला दिला आहे. यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स हे पाकिस्तानचा किंवा इराणची राजधानी तेहरानचा दौरा करण्याची देखील शक्यता आहे.