Pakistan: "लाच मागितली तर अधिकाऱ्याचं डोकं फोडा अन् त्याच्या मुलांना थेट सांगा की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 16:18 IST2024-03-21T16:17:06+5:302024-03-21T16:18:28+5:30
Pakistan, CM Controversial Statement: पाकिस्तानातील एका प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'लाच देणारे अन् घेणारे दोघेही नरकात जातील', असेही ते म्हणाले.

Pakistan: "लाच मागितली तर अधिकाऱ्याचं डोकं फोडा अन् त्याच्या मुलांना थेट सांगा की..."
Pakistan Controversy, Ali Amin Gandapur: निवडणुकांचा हंगाम आला की विविध प्रकारची वक्तव्ये सुरू होतात. त्यातील काही विधाने फार गाजतात, तर काही विधानांवरून टीकाही केली जाते. पण सध्या पाकिस्तानातील एका नेत्याने निवडणुका झाल्यानंतर एक विधान केले आहे. ते फारच चर्चेत आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला एक विचित्र अपील केले आहे. लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे डोके फोडून टाका, असा अजब सल्ला सीएम अली अमीन गंदापुर यांनी बुधवारी दिला आहे.
खैबर पख्तुनख्वा मधील डेरा इस्माईल खान येथे त्यांनी हे वक्तव्य केले. गंडापूर येथे सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आपल्या सरकारमध्ये कोणालाही लाच देऊन काम करून घेण्याची गरज नाही. कोणी लाच मागितली तर त्या अधिकाऱ्याला पहिले फटकवा आणि मग सरळ वीट घेऊन त्याचे डोके फोडून टाका.
लाच देणारे अन् घेणारे नरकात जातील!
डेरा इस्माईल खानमधील सय्यद अलीयान गावातील जाहीर सभेत केपी चे मुख्यमंत्री म्हणाले, "लाच घेणारे आणि देणारे नरकात जातील. जर कोणी तुमच्याकडे लाच मागितली तर माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका. त्याचे डोके स्वतः फोडून टाका आणि सांगा की हे मी तुम्हाला करायला सांगितले होते. लाच मागणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर वीट मारून त्याच्या मुलांना सांगा की तुम्ही त्यांच्या वडिलांना नरकात जाण्यापासून वाचवले आहे."
"लाच घेणाऱ्यांना जाहीर शिक्षा झालीच पाहिजे"
लाच घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे आणि असे करणाऱ्यांना जागीच शिक्षा झाली पाहिजे, असेही गंदापुर म्हणाले. अशा लोकांविरोधात खटले, पोलिस स्टेशन, कोर्ट अशा गोष्टी न करता थेट सर्वांसमोर धडा शिकवला पाहिजे. सरकारमधील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आणि स्वच्छ आणि पारदर्शक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असा शब्द त्यांनी दिला.