कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:06 IST2026-01-09T19:06:00+5:302026-01-09T19:06:45+5:30
पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील संबंध आता केवळ आर्थिक मदत किंवा लष्करी प्रशिक्षणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर ते थेट लष्करी युतीमध्ये रूपांतरित झाले आहेत.

कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
इस्लामाबाद - पाकिस्ताननं संपूर्ण जगाकडून कर्ज घेतले आहे. त्यातील एक मोठा हिस्सा चीन आणि सौदी अरेबियाकडून येतो. पाकिस्तानकडे इतके पैसे नाहीत की तो सौदीकडून घेतलेले कर्ज फेडू शकतो. मात्र कर्जाची परतफेड करण्यासाठी पाकिस्ताननं नवा फंडा शोधून काढला आहे. त्यात दोन्ही देशात सध्या चर्चा सुरू आहे.
सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला दिलेल्या २ अब्ज डॉलर कर्जाला शस्त्रांच्या डिलमध्ये बदलण्याचा विचार सुरू आहे. सौदी अरेबियाला कर्जाची परतफेड करण्याऐवजी चीन आणि पाकनं संयुक्त उत्पादन केलेले जेएफ १७ थंडर फायटर जेट देण्याची तयारी पाकिस्तानची आहे. हे अशावेळी समोर आलंय जेव्हा सौदी अरेबिया अमेरिकेकडून एफ १७ फायटर जेट खरेदी करण्याची चर्चा सुरू आहे. सध्या पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परदेशी मुद्रा कमी होत चालल्यात. आयएमएफ कार्यक्रम चालू असताना आणि कर्ज फेडण्याची त्यांची क्षमता मर्यादित असल्याने रोख रकमेऐवजी कर्जाचे लष्करी करारात रूपांतर करणे हा पाकिस्तानसाठी एक व्यवहार्य पर्याय म्हणून पाहिले जाते. सौदी अरेबिया देखील याकडे आपल्या सुरक्षा दृष्टीने ही संधी म्हणून पाहत आहे. विशेषतः मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या भूमिकेबद्दल वाढत्या अनिश्चिततेच्या वेळी ही सगळी रणनीती सुरू आहे.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे जवळचे संबंध
या दोन्ही देशांमधील संरक्षण करार काही नवीन नाहीत. गेल्या सप्टेंबरमध्ये दोन्ही देशांनी केलेल्या परस्पर संरक्षण करारामुळे हे संबंध नव्या उंचीवर पोहोचले. इस्रायलने कतारवर हल्ला केल्यानंतर हा करार झाला. या करारानुसार, जर एका देशावर हल्ला झाला तर दुसरा देश तो स्वतःवरील हल्ला मानेल. याचा अर्थ असा की पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील संबंध आता केवळ आर्थिक मदत किंवा लष्करी प्रशिक्षणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर ते थेट लष्करी युतीमध्ये रूपांतरित झाले आहेत.
दरम्यान, प्रस्तावित कराराची एकूण किंमत ४ अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकते. यापैकी २ अब्ज डॉलर्स सौदीचे कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील तर उर्वरित रक्कम शस्त्रास्त्र प्रणाली, इलेक्ट्रॉनिक प्रणाली, सुटे भाग आणि प्रशिक्षणावर खर्च केली जाईल. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख झहीर अहमद बाबर सिद्धू यांच्या अलीकडील सौदी अरेबिया दौऱ्याला आणि लष्करी सहकार्यावरील चर्चेला या कराराशी जोडले जात आहे. या कराराचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पाकिस्तान आता केवळ मदत मिळवणारा देश म्हणून नव्हे तर शस्त्रास्त्र निर्यातदार म्हणूनही स्वतःला स्थापित करू इच्छित आहे.