इस्रायल-अमेरिका पॅटर्नचा पाकला मोह; तालिबानी सर्वोच्च नेत्याला पाक मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 08:35 IST2026-03-10T08:35:22+5:302026-03-10T08:35:45+5:30

सध्या जगभरात युद्धाचे वारे सुरू आहेत. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा त्यात मृत्यू झाला आहे. पाकिस्तान यातच संधी शोधतो आहे.

Pakistan is fascinated by the Israel-America pattern; Will Pakistan kill the Taliban supreme leader? | इस्रायल-अमेरिका पॅटर्नचा पाकला मोह; तालिबानी सर्वोच्च नेत्याला पाक मारणार?

इस्रायल-अमेरिका पॅटर्नचा पाकला मोह; तालिबानी सर्वोच्च नेत्याला पाक मारणार?

कोण, कशात संधी शोधेल याबाबत काहीच सांगता येत नाही. सध्या जगभरात युद्धाचे वारे सुरू आहेत. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा त्यात मृत्यू झाला आहे. पाकिस्तान यातच संधी शोधतो आहे. इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात ज्याप्रमाणे त्यांनी खामेनेई यांना ठार मारलं, त्याचप्रमाणे आपणही तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांना ठार मारलं, तर आपलं ’नाव होईल’ असं त्यांना वाटतंय.

अर्थात, त्याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानचे सगळ्या आघाड्यांवर सध्या तीन-तेरा वाजले आहेत. खुद्द पंतप्रधानच जाहीरपणे म्हणताहेत, जगभरात विविध देशांकडे पैशांची भीक मागताना आता आम्हाला लाज वाटते! त्यात भारताशी स्पर्धा करताना सर्वच बाबतीत तोंडावर पडल्यानं तिथंही नाचक्की झाली आहे. सुशिक्षितांसह अल्पशिक्षित लोकही पाकिस्तान सोडून जाण्याची संधी शोधताहेत. टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानचा संघ खूप आधीच चारीमुंड्या चीत झाला. कुठेच आणि कुठल्याही पातळीवर एकही दिलासादायक घटना नाही. त्यात आपणच ज्यांना ‘वाढवलं’, मोठं केलं, त्या आपल्यापेक्षा तुलनेनं कमजोर असलेल्या तालिबानला जर आपण नमवलं, त्यांच्या सर्वोच्च नेत्याला ठार मारलं, तर जगात आणि देशातही आपलं कौतुक होईल आणि देशातील जनतेचं लक्ष दुसरीकडे जाईल असं त्यांना वाटतं आहे. 

त्यामुळेच इस्रायल-अमेरिकेनं इराणमध्ये जसं ऑपरेशन चालवलं तसंच आपण अफगाणिस्तानात चालवावं, असं पाकिस्तानला वाटू लागलं आहे. त्यासाठी लष्करप्रमुख असीम मुनीर पुढाकार घेत आहेत. पाकिस्तानी मीडिया आउटलेट एक्स्प्रेस ट्रिब्यूननं सांगितलं,, जर ‘संधी’ मिळाली तर पाकिस्तान अफगाण तालिबानच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्यात मागे हटणार नाही. पाकिस्ताननं ज्या भागांमध्ये हवाई हल्ले केले आहेत, त्यात काबुलसोबतच कंदहारचाही समावेश आहे, जिथे सर्वोच्च नेता अखुंदजादा स्वतः राहतात. 

पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानात मोहीम राबवत आहे, ज्यात हवाई आणि जमिनीवरील दोन्ही प्रकारचे हल्ले केले जात आहेत. पाकिस्ताननं म्हटलं आहे, या हल्ल्यांचा उद्देश अफगाणिस्तानच्या भूमीतून काम करणाऱ्या दहशतवादी गटांना लक्ष्य करणं आणि त्यांना कमकुवत करणं हा आहे. पाकिस्तानी ऑपरेशनमध्ये तालिबानचे मिलिट्री बेस, दारूगोळ्यांचे डेपो आणि इतर लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

पाकिस्ताननं अफगाण तालिबानवर ‘टीटीपी’सारख्या अतिरेकी गटांना आश्रय देण्याचा आरोप केला आहे. टीटीपीला पाकिस्तानातील मोठ्या हिंसाचारासाठी जबाबदार मानलं जातं. या गटानं गेल्या काही वर्षांत आपले हल्ले तीव्र केले आहेत आणि पाकिस्तानी सैन्य व इतर सुरक्षा दलांना लक्ष्य केलं आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्यानं सांगितलं की अफगाणिस्तानसाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. पाकिस्तान घाईत नाही. हे ऑपरेशन त्याच्या तार्किक शेवटापर्यंत नेलं जाईल. पाकिस्तानच्या मोहिमेत अखुंदजादा खरोखरच मारले जातील की नाही हे अलाहिदा; पण त्यानिमित्त पाकिस्तान स्वत:ची टिमकी वाजवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, एवढं मात्र नक्की..!

Web Title: Pakistan is fascinated by the Israel-America pattern; Will Pakistan kill the Taliban supreme leader?