'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 09:06 IST2025-10-24T09:04:27+5:302025-10-24T09:06:03+5:30
महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाने एक नवीन युक्ती अवलंबली आहे. त्यांनी मुस्लिम महिला लीग आणि मुस्लिम गर्ल्स लीग या दोन संघटना स्थापन केल्या आहेत.

'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाने एक नवीन युक्ती अवलंबली आहे. त्यांनी मुस्लिम महिला लीग आणि मुस्लिम गर्ल्स लीग या दोन संघटना स्थापन केल्या आहेत. या दोन्ही संघटनांची नावे वाचून असं वाटतं की,या संघटना महिलांच्या उन्नतीसाठी आणि शिक्षणासाठी काम करताना दिसतात, परंतु वास्तव काही वेगळेच आहे. या दोन्ही गटांचे नेतृत्व हाफिज सईदच्या स्वतःच्या कुटुंबातील महिला करत आहेत आणि त्यांचा खरा उद्देश महिलांना हळूहळू कट्टरतावादाकडे ढकलणे आहे. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
महिलांचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न
या संघटनांची नावे आणि त्यांचे कार्य अशा प्रकारे सादर केले जाते की, जणू काही ते समाजात मुस्लिम महिलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली या संघटना समाजात एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करतात. मात्र, पडद्यामागे या कार्यशाळा आणि बैठका महिलांच्या मनावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना इस्लामच्या नावाखाली भडकावले जाते आणि भारत आणि भारतीय सैन्याविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणे शिकवली जातात.
वर्गाचा व्हिडीओ आला समोर
अलिकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा एक सदस्य एमडब्ल्यूएलमधील महिलांना भारतीय सैन्याच्या अलीकडील कारवायांबद्दल शिकवताना दिसत आहे. हे जागरूकता सत्र वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते एक ब्रेनवॉशिंग सत्र आहे. महिलांना सांगितले जाते की भारतीय सैन्य मुस्लिमांविरुद्ध कट रचत आहे आणि त्यांनी या अत्याचाराविरुद्ध उभे राहिले पाहिजे. ही त्यांच्यात हळूहळू द्वेष आणि सूडाची खोटी भावना निर्माण करण्याची एक पद्धत आहे.
लष्कर-ए-तोयबा आता महिलांना करतेय लक्ष्य!
लष्कर-ए-तोयबासारख्यादहशतवादी संघटनांना आता हे समजले आहे की, शस्त्रांपेक्षा विचारांचा प्रभाव जास्त असतो. म्हणूनच, ते समाजात जिहादी विचारसरणी पसरवण्यासाठी महिला आणि तरुणींना लक्ष्य करत आहेत. बऱ्याचदा, या महिलांचा वापर प्रचार करण्यासाठी, संदेश देण्यासाठी किंवा संघटनेबद्दल सहानुभूती मिळविण्यासाठी केला जातो. मुख्य गोष्ट अशी आहे की या संघटना महिलांना सक्षम बनवत नाहीत, तर त्यांचे शोषण करत आहेत. शिक्षण आणि समाजसेवेच्या नावाखाली ते त्यांच्या मनात विष पेरत आहेत.