पाकिस्तान: मतदान सुरु असतानाच दहशतवादी हल्ला, निवडणूक कर्तव्यावर असलेले ४ पोलीस ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:12 PM2024-02-08T18:12:11+5:302024-02-08T18:20:40+5:30

सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या वाहनांवर बेछूट गोळीबार

Pakistan Election 2024 Terrorist attack on police vehicles at least 4 cops die in blast near polling station | पाकिस्तान: मतदान सुरु असतानाच दहशतवादी हल्ला, निवडणूक कर्तव्यावर असलेले ४ पोलीस ठार

पाकिस्तान: मतदान सुरु असतानाच दहशतवादी हल्ला, निवडणूक कर्तव्यावर असलेले ४ पोलीस ठार

Pakistan Elections 2024, Attack on Police cops: पाकिस्तानमध्ये आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत मुख्य लढत नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन, बिलावल भुट्टो झरदारी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि इम्रान खान यांची पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ यांच्यात होत आहे. मात्र काही जाणकारांच्या मते, लष्कराच्या इच्छेला जनतेच्या निवडीपेक्षाही जास्त महत्त्व दिले जाण्याची भीती आहे. या निवडणुकीत पाकिस्तानी लष्कर उघडपणे नवाझ शरीफ यांच्या पाठीशी उभे असल्याचे मानले जात आहे. तशातच पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानादरम्यान वायव्य पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेले चार पोलीस ठार झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीचे मतदान सुरू असताना खैबर पख्तनुख्वा विभागातील डेरा इस्माइल खान जिल्ह्याच्या कुलची परिसरात दहशतवादी हल्ला झाला. एका अज्ञात इसमाने आधी हातबॉम्ब हल्ला केला आणि त्यानंतर पोलिसांच्या वाहनांवर बेछूट गोळीबार केला. त्यात चार पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. अधिक माहितीच्या आधारे असेही समजते की, आणखी सहा पोलीस कर्मचारीही यामध्ये दुखापतग्रस्त झाले आहेत. सुरक्षा दलाची वाहने उभी असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर तेथील पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मीडिया प्राधिकरणाला दोन वृत्तवाहिन्यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल चेतावणी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच वेळी डॉनच्या वृत्तानुसार, निवडणूक वॉचडॉगने पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (पेमरा) ला जिओ न्यूज आणि एआरवाय न्यूजला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल चेतावणी देण्याचे निर्देश दिले आहेत. १२व्या सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय प्रचार ६-७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री संपला. आचारसंहितेनुसार, प्रसारमाध्यमांनी ६-७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर राजकीय प्रचार, प्रचाराच्या जाहिराती आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या लेखी सामग्रीचे प्रसारण बंद करायला हवे होते.

Web Title: Pakistan Election 2024 Terrorist attack on police vehicles at least 4 cops die in blast near polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.