मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 07:03 AM2024-05-27T07:03:08+5:302024-05-27T07:03:20+5:30

विशेष म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी अशी घट झाली आहे.

Mumbai South Central Lok Sabha Constituency: Who Has Been Affected by Declining Polling? | मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात मतदानाचा टक्का यंदा तब्बल १.६२ टक्क्यांनी घटला आहे. विशेष म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी अशी घट झाली आहे. याचा फटका कोणाला बसणार याचे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ५५.२ टक्के मतदान झाले होते. यंदा  टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न होऊनही येथे घट होऊन ते ५३.६० टक्क्यांवर आले. त्यातून आता राजकीय पक्षांचाही ताण वाढला आहे. या मतदारसंघात शिंदेसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि उद्धवसेनेचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. या क्षेत्रात भाजपाचे दोन, शिंदेसेनेचा एक असे युतीचे तीन आमदार आहेत. तर, काँग्रेसचा एक आणि उद्धवसेनेचे एक असे महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत.

माहिम विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार असून शेवाळे यांच्या प्रचारात ते आघाडीवर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांना या मतदारसंघातून ५३ हजार एवढे मताधिक्य मिळाले होते. शिवसेना भवनाच्या अंगणात असलेल्या या मतदारसंघात मराठी मतांचा टक्का मोठा आहे; मात्र माहीम मतदारसंघात गेल्या वेळच्या ५८.१६ टक्क्यांवरून मतदानाचा टक्का ५७.९७ टक्क्यांवर आला आहे. दोन्ही शिवसेनेतील फुटीनंतर आता मराठी मते नक्की कोणाकडे वळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. धारावी विधानसभेतून महाविकास आघाडीला अधिक मते मिळण्याची अपेक्षा होती. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आघाडीने रान उठविले होते. राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोपही धारावीत झाला होता. सध्या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

तसेच दाक्षिणात्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी राहुल शेवाळे यांच्यासाठी भाजपाने तामिळनाडू अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सभा धारावीत घेतली होती; मात्र या मतदारसंघातही मतदानाच्या टक्केवारीत किरकोळ अशी केवळ ०.४४ टक्क्यांचीच वाढ झाली आहे. त्यातच सायन कोळीवाडा भागातून भाजपाचे कॅप्टन तमिळ सेल्वन हे आमदार आहेत; मात्र या मतदारसंघातही २.१५ टक्क्यांनी मतदान घटले आहे. अणुशक्तीनगर भागात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. या भागात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आमदार आहेत. या निवडणुकीत त्यांनी कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थ भूमिका मांडली. त्यातून अणुशक्तीनगर भागातही मतदानाचा टक्का १.९५ टक्क्यांनी घसरला.

चेंबूर भागात उद्धवसेनेचे प्रकाश फातर्पेकर हे विद्यमान आमदार आहेत. या सहाही विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक ३.२१ टक्क्यांची घसरण चेंबूरमध्ये झाली आहे. विद्यमान आमदार असलेल्या फातर्पेकरांच्या मतदारसंघातच मतदान कमी झाल्याने त्याचा फटका नक्की कोणाला बसणार हे पाहावे लागेल. तर भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वडाळा मतदारसंघातही मतटक्का २.४७ टक्क्यांनी घसरला आहे.

मतदानाची टक्केवारी - मुंबई दक्षिण मध्य

विधानसभा    २०१९    २०२४ 
अणुशक्तीनगर    ५५.९५    ५४.२८  
चेंबूर    ५६.६९    ५३.४८ 
धारावी    ४८.०८    ४८.५२ 
सायन कोळीवाडा    ५३.७८    ५१.६३  
वडाळा    ५९.५८    ५७.११ 
माहिम    ५८.१६    ५७.९७

Web Title: Mumbai South Central Lok Sabha Constituency: Who Has Been Affected by Declining Polling?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.